Anil Parab on Shivsena Split: एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी उद्धव ठाकरेंच्या आदेशानं शांत बसलो होतो अन्यथा भुजबळ, राणेंवेळी झाले तसे राडे झाले असते असं अनिल परब म्हणालेत. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत अनिल परबांनी हा दावा केलाय. अनिल परबांचा हा दावा नारायण राणेंनी खोडून काढलाय.
बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत छगन भुजबळ आणि नारायण राणेंचं बंड झालं. त्या बंडावेळी बंडखोर नेते आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष झाला. पण शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या रुपानं जेव्हा सर्वात मोठी फूट झाली तेव्हा मात्र आंदोलन आणि राडे पाहायला मिळाले नाहीत. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र शांत होते. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडली. त्यावेळी शिवसैनिक शांत कसे बसले असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असलेले अनिल परब यांनी टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत शिवसैनिक शांत का राहिले याबाबत आपली भूमिका मांडली... मनानं साथ सोडलेले शिवसैनिक आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरेंनाच नको होते त्यामुळं शिवसैनिकांना शांत राहायला सांगितल्याचं अनिल परबांनी सांगितलंय.
अनिल परबांनी केलेला दावा मात्र नारायण राणेंना मान्य नाही. अनिल परब यांचा स्वभावच आक्रमक शिवसैनिकाचा नाही. अनिल परबांनी आतापर्यंत कुणाच्या कानशिलात तरी लगावलीये का असा सवाल नारायण राणेंनी केलाय.अनिल परब हे राडे करु शकत नाहीत पण ते खोटं बोलतात असा आरोप नारायण राणेंनी लगावलाय.
एकनाथ शिंदे हे खमके होते त्यामुळं उद्धव ठाकरेंनी आंदोलन केलं नाही असा दावा शिंदे समर्थकांकडून केला जातोय. या दावा उद्धव ठाकरे समर्थकांनी खोडून काढलाय. असं असलं तरी अनिल परबांनी दोन्ही शिवसेनेतील वादाला आणखी एक कारण दिलंय.