Amol Kolhe On Chaava Cinema: छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षमयी जिवनावर आधारित छावा सिनेमा प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडलाय. प्रेक्षक भरल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडत आहेत. या साऱ्यात काही वर्षांपुर्वी आलेल्या स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचीही चर्चा होताना दिसत असून मालिका आणि खासदार अमोल कोल्हेंवर प्रश्न उपस्थित केले जातायत. 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइंट' या विशेष मुलाखत कार्यक्रमात त्यांनी सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
छत्रपती संभाजी राजांना देण्यात आलेल्या यातना छावा सिनेमात दाखवल्या. पण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत का दाखवल्या नाही? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. मालिकेतून जो इतिहास मांडला ते नेरेटिव्ह छावाने उद्धस्त केले, असेही म्हंटले जातंय. यावर अमोल कोल्हे यांना प्रश्न विचारण्यात आला. मालिका संपून 5 वर्षे झाल्यानंतर असं नॅरेटिव्ह होतं तेव्हा त्यामागे कारण असतात. मी आता राजकारणात आहे. विरोधी पक्षात आहे. त्यामुळे असं बोललं जात असल्याचे ते म्हणाले. 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेमुळे छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचले. संभाजी महाराजांच्या बलिदानाचा प्रसंग दाखवताना कितपत दाखवावा? याची बंधन आम्हाला होती, असे त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती संभाजी राजांनी कमी वयात अनेक यशस्वी लढाया लढल्या. त्यांचा शेवट दु:खद झाला. तो मालिकेत का दाखवला नाही? यामागे राजकीय भूमिका होती का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यामध्ये राजकीय भूमिका अजिबात नव्हती. टेलिव्हिजनचे काही स्टॅंडर्ड असतात. प्रेक्षागृहातून जाताना कोणी संभाजींचे रक्तबंबाळ रुप डोळ्यात घेऊन जाऊ नये ही माझी भावना आहे. शंभूंच तरणाबिंड रुप घेऊन जावं, असं मला वाटतं, असे ते म्हणाले.
सिनेमा पाहून लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. ही संधी मालिकेला होती का? या प्रश्नाचेही अमोल कोल्हे यांनी स्पष्टपणे उत्तर दिले. टेलिव्हिजनवर तुम्हाला सर्व गोष्टी दाखवता येत नाही. तुम्ही सिनेमा बघायला जाता तेव्हा तशी मानसिकता घेऊन जाता. पण मालिकेमध्ये तुम्ही 40 दिवस सतत रक्त दाखवू शकत नाही. टेलिव्हिजनला एसओपी संभाळाव्या लागतात. तुम्हाला युद्ध दाखवायचे असेल तर तलवार दाखवू शकता पण आरपार घुसलेली तलवार दाखवू शकत नाही. संभाजी महाराजांनी जे सहन केलं ते प्रतिकात्मक रुपांनी पोहोचवलं गेलंय, असे ते म्हणाले. आम्ही सादर केलेल्या महानाट्याची स्क्रिप्ट तीच आहे तोच प्रसंग आहे. तिथे 22-25 मिनिटे बलिदानाचा प्रसंग आहे. त्या माध्यमानुसार तो प्रसंग दाखवण्यात आल्याचे ते म्हणाले.
तुम्ही राष्ट्रीवादी कॉग्रेसमध्ये होतात म्हणून सेक्यूलर भूमिका घेतली का? स्वराज्यरक्षक मालिकेवर शरद पवारांचा दबाव होता, अशी शंका उपस्थित केली जाते. यावर अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले. शरद पवार यांनी स्वराज्यरक्षक मालिका लॉकडाऊनवेळी पहिल्यांदा पाहिली. त्यामुळे त्यांच्या सूचनेचा यात सुतरामही संबंध नाही, असे म्हणत त्यांनी वृत्त फेटाळून लावले.