मुंबईतल्या शिवस्मारकाच्या ऑफिसची दुर्दशा, एकही वीट न रचलेल्या स्मारकाचं भवितव्य काय?

Shiv Smarak: अरबी समुद्रातल्या स्मारकावर सरकार काहीही बोलायला तयार नाही.

Pravin Dabholkar | Updated: Mar 17, 2025, 09:40 PM IST
मुंबईतल्या शिवस्मारकाच्या ऑफिसची दुर्दशा, एकही वीट न रचलेल्या स्मारकाचं भवितव्य काय?
शिव स्मारक

गोविंद तुपे, झी 24 तास, मुंबई: अरबी समुद्रात जगातलं सर्वात उंच शिवस्मारक बांधण्याचा सरकारनं संकल्प केला होता. या संकल्पाचा सरकारला विसर पडला असून स्मारक उभारणीसाठी तयार केलेल्या ऑफिसचाही सरकारला विसर पडलाय. मुंबईतल्या कफ परेडमध्ये उभारण्यात आलेल्या ऑफिसचा भूतबंगला झालाय. तिथीनुसार शिवजयंतीच्या निमित्तानं सरकारला शिवस्मारकाची आठवण करुन देण्याचा हा झी 24 तासचा प्रयत्न.

महाराष्ट्र सरकारनं 2014मध्ये मुंबईत अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली.  जगातलं सर्वात उंच स्मारकाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलपूजन झालं. सरकारी पातळीवर अरबी समुद्रात स्मारक उभारण्याची लगबग सुरु झाली. पण ही लगबग औटघटकेची ठरली.2014 नंतर अरबी समुद्रातलं स्मारक कोणत्या ना कोणत्या कारणानं रखडत गेली.

अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी मुंबईच्या कफ परेड भागात ऑफिस उभारण्यात आलं होतं. स्मारक लांबणीवर पडलेलं असताना त्या ऑफिसला अवकळा आलीय. त्यावेळी 1 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या कंटेनर ऑफिसला अडगळीचं स्वरुप प्राप्त झालंय. ऑफिसचा वापर केव्हाच बंद झाला असून तिथं गुर्दुले आणि समाजकंटकांचा वावर वाढलाय. सरकारनं नाही म्हणायला एक सुरक्षा रक्षक नेमलाय. पण त्यालाही काहीच बोलायचं नाही.

स्मारकाच्या ऑफिसमधलं सगळं सामान सडून गेलंय. पत्र्याच्या कंटेनरला गंज चढलाय. ऑफिसला अवकळा आलीये. झी 24 तासच्या टीमनं या ऑफिसमध्ये प्रवेश केला तेव्हा सगळं सामान विखुरलेलं दिसलं. सरकारकडून झालेली ऑफिसची उपेक्षा पाहता सरकारला अरबी समुद्रात स्मारक उभारायचं आहे की नाही असा प्रश्न सामान्यांना पडलाय. शिवस्मारकाच्या ऑफिसची झालेली दुरवस्था झी 24 तासनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांच्याही लक्षात आणून दिली. ऑफिसची दुरवस्था पाहिल्यावर सरकारची मानसिकता काय आहे हे लक्षात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

अरबी समुद्रातल्या स्मारकावर सरकार काहीही बोलायला तयार नाही. भविष्यात स्मारक उभारणार की नाही हे सुद्धा कोणी सांगत नाही. किमान स्मारक उभारण्यासाठी जे ऑफिस तयार केलं त्याची तरी काळजी घेणं गरजेचं होतं. ऑफिसच्या दुरवस्थेवरुन एकही वीट न रचलेल्या स्मारकाचं भवितव्य काय असणार याची कल्पना सर्वांनांच आली असावी.