'एकनाथ शिंदेंनी बोलू नका सांगितलंय,' रवींद्र धंगेकरांनी अखेर सांगून टाकलं, 'मला किंमत मोजावी लागली तरी...'

Ravindra Dhangekar To The Point Interview: एकनाथ शिंदे यांनी कोणाचंही नाव न घेता फक्त घोटाळ्यांसदर्भात बोलण्यास सांगितलं असल्याचा खुलासा शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 1, 2025, 10:15 PM IST
'एकनाथ शिंदेंनी बोलू नका सांगितलंय,' रवींद्र धंगेकरांनी अखेर सांगून टाकलं, 'मला किंमत मोजावी लागली तरी...'

Ravindra Dhangekar To The Point Interview: शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन बोर्डिंग प्रकरणावरुन मुरलीधर मोहोळ यांच्याविरोधात आरोपांचं रान उठवलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आपल्याला कोणाचंही नाव न घेता फक्त घोटाळ्यांसदर्भात बोलण्यास सांगितलं असल्याचा खुलासा रवींद्र धंगेकर 'झी 24 तास'च्या टू द पॉईंट या विशेष कार्यक्रमात केला आहे. तोडगा निघताना दिसत आहे, पण माझं समाधान झालेलं नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

"आता काही दिवस नाव घ्यायचं नाही असं ठरलं आहे. एकनाथ शिंदेंनी यावर बोलू नका सांगितलं आहे. मी गप्प बसलेलो नाही. आरोप करा, पण त्या घोटाळ्यासंदर्भात बोला असं सांगितलं आहे. मला माझ्या नेत्याने सांगितलं आहे. आळंदीला त्यांनी दोन दिवसात विषय संपवून टाकतो असं सांगितलं आहे. तोडगा निघताना दिसत आहे, पण माझं समाधान झालेलं नाही," असं धंगेकरांनी सांगितलं आहे. 

रवींद्र धंगेकर यांचा बॉस कोण? स्वत: केला खुलासा, एकनाथ शिंदे नव्हे तर यांचं घेतलं नाव; म्हणाले 'माझा गुरु...'

 

धंगेकर शांत कधी बसणार? असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "माझे बॉस मला चुकीच्या गोष्टीला पाठिंबा द्या सांगणार नाही. याआधी मी निलेश घायवळांवर बोललो, तेव्हा त्यांनी गुन्हेगाराला माफी द्यायची नाही सांगितलं. जैन बोर्डिंगवर तेही बोलतात. विद्येच्या माहेरघऱात असा भीमपराक्रम कोणी केला असेल तर आम्ही सोडणार नाही. सोडेल तो धंगेकर कुठला. माझं आंदोलन नेहमी शेवटपर्यंत जातं. त्यासाठी मला राजकीय किंमत मोजावी लागली तरी मोजणार. माझ्याविरोधात मोठी यंत्रणा उभी राहिली. त्याचंही मला नुकसान झालं आणि पुढेही होईल". 

धंगेकरांचा बॉस कोण?

धंगेकरांचा बॉस कोण असं विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की, "धंगेकर कोणाच्याही ऐकण्यात कधीच काम करत नाही. 35 वर्षाच्या राजकारणात माझा गुरु मीच आहे. फक्त एक आहे की, कोणीही आलं तरी मी त्यांचा मान, सन्मान ठेवतो. सर्वसामान्य आला तरी त्याला गुरु मानतो. माझा गुरु पुणेकर आहे".

चंद्रकांत पाटलांवर खळबळजनक आरोप

"तुमच्या विरोधात लोकसभा, विधानसभा लढलो म्हणून माझ्या कुटुंबात विष कालवण्याचं काम नाही. माझ्यावर हल्ला करा, पण माझ्यासोबत चार लोक आहेत त्याचं काय? तुम्ही आमच्या पत्नीचं नाव घेता तेव्हा तिथे थांबलं पाहिजे. माझ्यासोबत लढा ना. प्रत्येकवेळी आपली ताकद वापरुन माझ्या अंगावर लोक सोडणार. ही सोडलेली लोक आमच्या साईटवर येऊन आरडाओरड करत घोषणा देतात. काही आलं की वक्फ बोर्डाचा विषय काढतात. एकदाच काय ते संपवून टाका. एकतर फाशी द्या किंवा कुटुंबाला जेलमध्ये टाका," असंही ते म्हणाले. 

एक तर ते कोल्हापुरातून पुण्यात आले. पण आम्ही त्यांना परकं म्हटलं नाही. त्यांनी तर याच्या पलीकडील यंत्रणाही वापरली आहे असाही आरोप त्यांनी केला.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More