मुंबई : औषधं खरेदी करताना आपण पहिली गोष्ट पाहतो ती म्हणजे एक्सपायरी डेट.. मात्र अनेकदा घरात ठेवलेल्या औषधांचीही एक्सपायरी डेट गेलेली असते आणि याबाबत आपल्याला माहिती देखील नसतं. जेव्हा त्या औषधाची आपल्याला असते तेव्हा औषध एक्स्पायर झाल्याचं समजतं. औषधं एक्सपायर झाल्यानंतर त्याचं सेवन केल्यास नेमके काय परिणाम होतात याबाबात तुम्हाला माहिती आहे का. जाणून घेऊया अशी औषधं घेतल्यावर नेमका काय परिणाम होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, एखाद्या औषधं एक्सपायरी डेट संपल्यानंतर घेतलं तर त्याचा शरीरावर नक्कीच परिणाम होतो. मात्र हा परिणाम नेमका कसा होतो हे प्रत्येक औषधावर अवलंबून असतं.


झी 24 तासशी बोलताना मुंबईतील डॉ. रेवत कानिंदे म्हणाले, "एक्सपायरी डेट निघून गेलेल्या औषधांचं सेवन केल्याने शरीरावर तसंच आरोग्यावर नक्कीच विपरीत परिणाम होतो. मात्र प्रत्येक ड्रगनुसार हा परिणाम वेगवेगळा असू शकतो. एक्सपायरी डेट संपून गेल्यावर औषधाची कार्यक्षमता काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे एक्सपायर झालेल्या औषधांच्या सेवनाने मृत्यू ओढावतोच असं नाही."


डॉ. कानिंदे पुढे म्हणाले, "एक्सपायरी निघून गेलेल्या औषधांचं सेवन करू नये. मात्र चुकून तुम्ही कधी या एक्सपायर झालेल्या औषधांचं सेवन केलं तर घाबरून न जाता तातडीने डॉक्टरांकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यावा."


असा प्रकार घडू नये यासाठी औषधांची खरेदी करताना ती नीट तपासून घ्यावीत. त्याचप्रमाणे घरात बराच काळ असलेल्या औषधांचं सेवन करताना त्याची एक्सपायरी डेट पाहून घ्यावी. तसंच औषधांची मुदत संपली असल्यास तातडीने ती योग्य पद्धतीने फेकून द्यावी, असं सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.