वॉशिंग्टन : फार वेळ बसून राहणे आणि शरीराची अधिक हालचाल न करणे यामुळे भविष्यात चालता न येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आली आहे. प्रतिदिन पाच तासांपेक्षा अधिक वेळ टीव्हीसमोर बसणे किंवा आठवडय़ातून तीन किंवा अधिक तास शारीरिक हालचाली कमी करणाऱ्या वयोवृद्ध लोकांना हा धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे त्यांना अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो, असे अमेरिकेतील जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठाच्या लोरेट्टा डायपेट्रो यांनी म्हटले आहे. खूप वेळ ट्वसमोर बसल्याने वृद्धांच्या शरीराचे नुकसान होऊन शरीर निष्क्रिय होते, असे त्यांनी सांगितले.
संशोधकांनी या अभ्यासासाठी सहा राज्ये आणि दोन प्रमुख शहरांमधील ५० ते ७१ या दरम्यान वय असणाऱ्या पुरुष आणि महिलांचा अभ्यास केला. अभ्यासाच्या सुरुवातीला सर्व सहभागी निरोगी होते. वृद्ध लोक किती वेळ टीव्ही पहातात, व्यायाम, बागकाम, घरकाम तसेच इतर शारीरिक काम करतात यावर संशोधकांनी लक्ष ठेवले. या प्रकारे सहभागींवर १० वर्षे लक्ष ठेवण्यात आले.
या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सहभागी झालेल्या सगळ्या निरोगी वृद्धांपैकी ३०% वृद्धांना अपंगत्वाचा सामना करावा लागत होता. यामध्ये अनेक जणांना चालण्याची समस्या निर्माण झाली होती. तसेच त्यामुळे शारीरिक क्रियांचा वेळ मंदावतो. सध्याच्या जीवनशैलीत प्रत्येक दिवसाला बसण्याचे काम १४ तास झाले आहे. त्यामुळे जर वृद्धांना सुदृढ राहायचे असले तर त्यांनी दररोज पुरेसा व्यायाम करणे, गरजेचे आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.