रात्रीचं जेवण आणि झोपेची वेळ यामध्ये इतक्या तासांचं ठेवा अंतर!

जर तुम्ही खूप उशीरा जेवता आणि त्यानंतर झोप येत नसेल तर ते इन्सोम्नियाचं लक्षण आहे. 

Updated: Jul 20, 2021, 02:17 PM IST
रात्रीचं जेवण आणि झोपेची वेळ यामध्ये इतक्या तासांचं ठेवा अंतर!

मुंबई : जर तुम्ही खूप उशीरा जेवता आणि त्यानंतर झोप येत नसेल तर ते इन्सोम्नियाचं लक्षण आहे. जेवणानंतर किती तासांनी आपण झोपायला गेलं पाहिजे? जेवणानंतर ताबडतोब झोपणं आरोग्यासाठी वाईट असतं का? मुळात जेवण आणि झोप यामध्ये किती वेळाचं अंतर असलं पाहिजे याबाबत तुम्हाला माहिती आहे का? 

खाल्ल्यानंतर किती वेळानंतर झोपायला गेलं पाहिजे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. अनेकदा एका जागी बसून काम केल्यानंतर लोकं रात्री उशीरा जेवतात आणि जेवणानंतर लगेचच झोपतात. पण असं करणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. जाणून घ्या जेवण आणि झोप याच्या मध्ये किती तासांचं अंतर असावं आणि का?

दिवसाचे अखेरचं जेवण आणि झोपायला जाण्याच्या मध्ये तीन तासांचे अंतर असणं गरजेचं आहे. तीन तासांच्या अंतरांमध्ये पोटातून अन्न लहान आतड्यांकडे सरकतं. यामुळे पचनक्रिया सुरूळीत होण्यास मदत होते. तसंच रात्री छातीत जळजळ आणि निद्रानाशासारख्या समस्या देखील उद्भवत नाहीत. 

जेवणानंतर झोपायला उशीर झाल्यामुळे छातीत जळजळ होण्याची लक्षणं कमी दिसून येतात. पण जेवल्यानंतर ताबडतोब झोपल्यास चिडचिडेपणा समस्या उद्भवू शकतात. तर दुसरीकडे जेवण आणि झोपेच्या दरम्यान तीन तासाचं अंतर ठेवल्यास रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

जेवणाचा झोपेवर होतो परिणाम

झोपायच्या अगदी आधी जेवण जेवल्यास तुमची झोप बिघडू शकते. खाल्ल्यानंतर ताबडतोब झोपल्यामुळे रिफ्लेक्सची लक्षणं उद्भवू शकतात. यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थता आणि तोंडात कडवट चव येऊ शकते. मसालेदार आणि एसिडीक पदार्थांमुळे सर्वाधिक समस्या उद्भवतात.