Signs of Depression in Men: नैराश्य (Depression).... गेल्या काही वर्षांमध्ये या मानसिक स्थितीविषयी अधिक प्रभावीपणे बोललं जात आहे. पुरुष आणि महिलांमध्ये या मानसिक स्थितीची वेगवेगळी लक्षणं आढळतात. अनेकदा व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात ही लक्षणं अधिकच स्पष्टपणे दिसून येतात. वेळीच या लक्षणांकडे लक्ष देण्यात आलं नाही, तर मात्र नैराश्याच्या गर्त छायेत गेलेल्या व्यक्तीला तिथून परत आणणं अतिशय आव्हानात्मक ठरू शकतं. त्यामुळं वेळीच या लक्षणांकडे लक्ष दिलं जाणं गरजेचं. फक्त महिलाच नव्हे, तर अव्यक्त राहणारी पुरूष मंडळीसुद्धा नैराश्याचा शिकार होतात.
चिडचीड
पुरुषांमध्ये नैराश्याच्या प्राथमिक स्थितीच्या खुणा त्यांच्या संतप्त स्वभावातून आणि सततच्या चिडचिडीतून दिसून येतात. ही अशी स्थिती असते जिथं ते सतत चिडचीड करत असतात.
थकवा
नैराश्याचा सामना करणारी व्यक्ती फक्त शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्यासुद्धा थकलेली असते. कितीही उत्साही वातावरणातही त्यांना थकल्यासारखं वाटत राहतं.
दुरावा
सहसा सतत एकाकी राहण्याची इच्छा होत असल्या कारणानं ही मंडळी मित्रपरिवाराशी दुरावा पत्करतात. विविध स्नेहसंमेलनाला जायचं टाळतात. कोणाच्या संपर्कात राहत नाहीत.
निद्रानाश
नैराश्याचा सामना करणाऱ्या व्यक्तींना निद्रानाचाशी समस्या सतावते किंवा काहींना प्रमाणाहून जास्त झोप येत राहते. ही समस्या व्यक्तीनुरुप बदलत जाते. या व्यक्तीला कशातच रस वाटत नाही.
नैराश्याच्या सावटापासून कसं दूर जावं?
पुरुष मंडळी किंवा इतर कोणीही व्यक्ती वरील कोणत्याही लक्षणांचा सामना करदत असल्यास सकारात्मक दृष्टीकोनासाठी या व्यक्तींनी दर दिवशी व्यायाम करावा. योगसाधना, ध्यानधारणा करूनही मानसिक ताण दूर ठेवता येतो. पुरेशी झोप घेतल्यानंही मानसिक आरोग्य संतुलित राहतं. पण, जर कितीही उपाय करुनही या लक्षणांपासून सहजगत्या दुरावा मिळत नसेल, तर मात्र मानसोपचारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांशी संपर्क साधावा.
(वरील संदर्भ माहितीच्या हेतूनं देण्यात आला असून, कोणत्याही आरोग्यविषयक सल्ल्यांसाठी डॉक्टरांचं मार्गदर्शन अवश्य घ्या.)