... म्हणून काहींचे पदार्थांवर ताव मारूनही वजन वाढत नाही

काहीही आणि कितीही खाल्लं तरीही वजनच वाढत नाही अशी किमान एक व्यक्ती प्रत्येकाच्या ओळखीत असतेच ! 

Updated: Jun 28, 2018, 01:35 PM IST
... म्हणून काहींचे पदार्थांवर ताव मारूनही वजन वाढत नाही  title=

मुंबई : काहीही आणि कितीही खाल्लं तरीही वजनच वाढत नाही अशी किमान एक व्यक्ती प्रत्येकाच्या ओळखीत असतेच ! गोड असो किंवा स्ट्रीट फूड .. तोंडाला हमखास पाणी सुटेल अशा पदार्थांवर ताव मारूनही शरीरावर मूठभरही मांस न चढणार्‍यांचा तुम्हांला हेवा वाटत असेल.. अनेकजण त्यांच्या सिक्रेट फीटनेस प्लॅनवर लक्ष ठेवून असतात, तुम्हांला या मोठ्या रहस्यामागचं गणित समजून घ्यायचं आहे का? मग हा सल्ला नक्की वाचा.  

शरीराच्या बेसल मेटॅबॉलिक रेटवर (Basal Metabolic Rate)वजन घटणं किंवा कमी होणं अवलंबून असते. व्यक्तीपरत्त्वे प्रत्येकाचा हा मेटॅबॉलिक रेट वेगवेगळा असतो. काहिंचा नैसर्गिकरित्या हा रेट उत्तम असल्याने एखाद्या पदार्थावर ताव मारल्यानेही त्याचा आरोग्यावर परिणाम होत नाही.  

Basal Metabolic Rate म्हणजे काय?  

Basal Metabolic Rate म्हणजे शरीर आरामदायी स्थितीत असताना किती प्रमाणात उर्जा वापरते याचे गणित. आराम कोणतेही शारिरीक कष्टाचे काम करत नसतो तेव्हाही नकळत शरीर काही उर्जा वापरत असते. शरीराकडून श्वासोश्वासासाठी,हृद्याच्या पंपिंगसाठी, मेंदूच्या कार्यासाठी काही उर्जा वापरली जाते. 

ज्या व्यक्तीचा हा BMR रेट अधिक असतो त्यांच्याकडून आरामदायी परिस्थितीत असताना अधिक कॅलरीज बर्न केल्या जातात. म्हणूनच अधिक खाऊनदेखील या व्यक्तीच्या वजनावर त्याचा थेट दुष्परिणाम दिसून येत नाही. 

वयानुसार व्यक्तीचा BMR कमी होत असतो. मात्र मसल  मास वाढवल्यास ते वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच लहान मुलं प्रौढांच्या तुलनेत अधिक गोड पदार्थ खाऊ शकतात.  

बारीक आहात म्हणजे हेल्दी हा निव्वळ गैरसमज 

भारतीयांमध्ये सहज वजन वाढण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे आपण बारीक आहोत म्हणजे आपण हेल्दी आहोत असा काहींचा समज असतो. हेल्दी असणं आणि फीट असणं यामध्ये फरक आहे. त्यामुळे शरीराचे स्वास्थ्य जपण्यासाठी प्रत्येकाला व्यायामाची गरज असते. 

कसं असतं हे गणित?

सारख्याच वजनाच्या, उंचीच्या, वयाच्या आणि सारख्याच प्रमाणात अन्न खाणार्‍या भारतीय आणि युरोपियन व्यक्तीला तुम्ही पाहिल्यास, भारतीयांमध्ये युरोपियन्सच्या तुलनेत शरीरात फॅट्स निर्माण होण्याच प्रमाण अधिक जाणवेल. यामुळेच भारतीयांना कार्डियोव्हस्कुलर म्हणजेच हृद्यविकाराचा धोका अधिक असतो.  

म्हणूनच खाण्या-पिण्यावर ताव मारूनही वजन वाढत नसणार्‍या आणि म्हणून व्यायामाचा कंटाळा करणार्‍यांनो, वेळीच भानावर या आणि व्यायामाला सुरूवात करा.