मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती; रुग्णांसाठी नवे आशेचे दालन

मेंदू आणि मणक्याच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात झालेली प्रगती ही रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 7, 2026, 10:52 PM IST
मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियेत उल्लेखनीय प्रगती; रुग्णांसाठी नवे आशेचे दालन

मेंदू आणि मणक्याच्या आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, न्यूरोसर्जरीच्या क्षेत्रात झालेली प्रगती ही रुग्णांसाठी दिलासादायक ठरत आहे. अलिकडच्या वर्षांत मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये मोठी क्रांती झाली असून, आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक सुरक्षित, अचूक आणि परिणामकारक ठरत आहेत. मेंदू आणि मणका हे शरीरातील सर्व नसा नियंत्रित करणारे प्रमुख केंद्र असल्याने, ट्यूमर, स्ट्रोक, स्लिप डिस्क, स्पाइनल नर्व्ह कॉम्प्रेशन किंवा संसर्ग यांसारख्या समस्यांचा थेट परिणाम हालचाल, स्मरणशक्ती, संतुलन आणि दैनंदिन जीवनावर होतो. तज्ज्ञांच्या मते, अशा आजारांमध्ये वेळेवर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती डॉ. सुनील कुट्टी, न्यूरोसर्जन (ब्रेन अँड स्पाइन) यांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source

 

मिनीमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रिया ठरत आहे वरदान

न्यूरोसर्जरीमध्ये आता मोठ्या शस्त्रक्रियांऐवजी मिनीमली इन्व्हेसिव्ह  (Minimally Invasive) पद्धतींचा वापर वाढला आहे. या तंत्रामुळे जखम कमी होते, संसर्गाचा धोका घटतो, रुग्ण लवकर बरा होतो आणि रुग्णाचा रुग्णालयातील कालावधीही कमी होतो. पार्किन्सन रोग आणि सतत थरथरणे (Essential Tremor) यांसारख्या आजारांमध्ये डीप ब्रेन स्टिम्युलेशन (DBS) ही पद्धत प्रभावी ठरत आहे. या उपचारात मेंदूतील विशिष्ट भागात इलेक्ट्रोड बसवून मेंदूचे सिग्नल नियंत्रित केले जातात. त्यामुळे रुग्णांच्या हालचाली सुधारतात आणि जीवनमान उंचावते.

रोबोटिक तंत्रज्ञानामुळे मणक्याच्या शस्त्रक्रिया अधिक सुरक्षित

मणक्याच्या शस्त्रक्रियांमध्ये आता रोबोटिक-असिस्टेड तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. ट्यूमर काढणे किंवा स्पाइनल फ्यूजनसारख्या शस्त्रक्रियांमध्ये रोबोट सर्जनला अधिक अचूकतेने काम करण्यास मदत करतात. त्यामुळे गुंतागुंत कमी होते आणि रुग्ण लवकर बरा होतो. तंत्रज्ञानाचा वेगाने होत असलेला विकास पाहता, भविष्यात मेंदू आणि मणक्याच्या आजारांवरील उपचार अधिक प्रभावी होतील, असा विश्वास तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या प्रगतीमुळे जगभरातील असंख्य रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More