चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार ?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दूर केल्या सर्व  शंका   

Updated: Feb 11, 2020, 01:41 PM IST
चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार ?

मुंबई : चीनमध्ये कोरोना व्हारसमुळे अनेकांचे बळी जात आहेत. आता चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरसचा फैलाव होत आहे अशा चर्चा देखील जोर धरू लागल्या आहेत. तर खरचं चिकन खाल्ल्यामुळे कोरोना व्हायरस फैलावतो का? कोरोनामुळे जे मृत पावले आहेत, ते देखील चिकन खात असतील असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच उपस्थित झाला असेल. नुकताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसमुळे अलर्ट घोषित केले आहे. 

या अलर्टमध्ये मंत्रालयाने सांगितले की अंडं किंवा चिकन खाण्यापूर्वी ते चांगल्या प्रकारे शिजवायला हवं. अशात देखील अंडी आणि चिकन खाण्यासाठी काही प्रमाणात शंका व्यक्त करण्यात येत आहे. सध्या कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्यात येत आहे. 

संपूर्ण देशात चिकनचा खप कमी झाला आहे.
विभिन्न रिपोर्टनुसार चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे भारतात चिकनचा खप कमी झाला आहे. भारतात १० ते १५ टक्के चिकनची मागणी कमी झाली आहे. गेल्या वेळेस सार्स व्हायरसमुळे चिकनच्या मागणीत घट झाली होती. त्यामुळे यंदा देखील चीकन प्रेमींनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार चिकनचे दर किलोमागे १०० रूपयांनी घटले आहे. दिल्लीमध्ये चिकनचे दर ७२ रूपये प्रतिकिलो झाले आहेत. त्याचप्रमाणे पुण्यात चिकनचे दर ६५ रूपये किलो झाले आहेत. शिवाय अंड्यांच्या दरात देखील घट झाली असल्याचे सांगितले जात आहे. 

सध्याच्या वैज्ञानिक संशोधनात असे दिसून येत आहे की, हा विषाणू अजूनही चीनमध्ये एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे पसरत आहे. पण चिकनमध्ये अद्याप विषाणूचा संसर्ग आढळलेला नाही. त्यामुळे चिकन खाणे पूर्णपणे सुरक्षित असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे म्हटलं आहे.