दिल्ली : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. दिल्ली, महाराष्ट्र आणि इतर मेट्रो शहरांमध्ये कोरोनाची सर्वाधिक प्रकरणं आढळून आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 1,41,986 नवीन रुग्ण आढळले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे सुमारे 41 हजार कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 285 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी रेट 9.28 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. देशात कोरोनाचे 4,72,169 एक्टिव्ह रुग्ण आहेत. तर दुसरीकडे देशातील 150.06 कोटी लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलेली आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 39,876 इतके रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याचं लक्षात आल्यावर दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू केला. यानंतर बिहार, यूपी आणि इतर राज्यांमधून दिल्लीमध्ये आलेले मजूर घरी परतत आहेत.
गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 40,925 नवीन रुग्णांचं निदान करण्यात आलं आहे. तर 14,256 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची नोंद आहे. तर 20 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन देखील अनेक राज्यांमध्ये पसरला आहे. आतापर्यंत, देशातील 27 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ओमाक्रॉनची एकूण 3,071 प्रकरणं नोंदवली गेली आहेत. त्यापैकी 1,203 रुग्ण बरे होऊन घरी परतल्याची माहिती आहे.