गहू किंवा तांदळाचं पीठ नव्हे तर मधुमेहींनी 'या' पीठाचा आहारात करावा समावेश

मधुमेहाच्या रूग्णांना आहारासंबंधी पथ्य पाळावी लागतात. 

Updated: Jun 17, 2021, 07:24 AM IST
गहू किंवा तांदळाचं पीठ नव्हे तर मधुमेहींनी 'या' पीठाचा आहारात करावा समावेश

मुंबई : बदलत्या आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक आजार मागे लागतात. जेवणाच्या अनिश्चित वेळा तसंच असंतुलित आहारामुळे रक्तातील महत्त्वाच्या घटकांचं प्रमाण हे कमीजास्त होतं. याच साऱ्या परिस्थितीचे परिणाम म्हणजे मधुमेहासारखी समस्या उद्भवण्याची शक्यता वाढते. मधुमेहाच्या रूग्णांना आहारासंबंधी पथ्य पाळावी लागतात. दरम्यान टाईप 2 मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रूग्णांसाठी फणसाचं पीठ फायदेशीर ठरतं.

मधुमेही रूग्णांनी तांदूळ किंवा गव्हाच्या पीठाच्या सेवनाव्यतिरीक्त हिरव्या फणसाच्या पीठाचं सेवन करावं. यामुळे मधुमेह असणाऱ्या रूग्णांना त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात आणण्यात मोठी मदत होते. असं एका अभ्यासातून समोर आलं आहे. 

नेचर या मेडिकल मासिकामध्ये यासंदर्भातील अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये सलग 12 आठवडे फणसाच्या पीठाचं सेवन केलेल्या रुग्णांमध्ये glycosylated haemoglobin (HbA1c) मोठ्या प्रमाणात नियंत्रणात आल्याचं लक्षात आलं. 

ए. गोपाळ राव, के. सुनील नाईक, ए.जी. उन्नीकृष्णन आणि जेम्स जोसेफ यांनी मिळून हा अभ्यास केला आहे. भारतातील हिरव्या आणि कच्च्या फणसाची तत्त्वं माहिती घेत टाईप 2 चा मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या आहारात या पीठाचा समावेश केला होता.

मे 2019 ते फेब्रुवारी 2020 च्या काळामध्ये हा अभ्यास करण्यात आला. यामध्ये 18 ते 60 वयोगटातील 40 जणांचा समावेश करण्यात आला होता. यांच्या आहारात फणसाच्या पिठाचा समावेश केल्यानंतर त्यांच्यातील एचबीए 1सी कमी झाल्याचं आढळून आलं. या अभ्यासादरम्यान उपाशीपोटी तसंच जेवल्यानंतर रक्तातील साखरेची तपासणी केली. या तपासणीतून 7 दिवसांत रक्तातील साखरेच्या प्रमाणात घट झाल्याचं दिसून आलं.