एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता

How To Control Mind : अनेकदा आपण शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतो मात्र मानसिक आरोग्याचा विचार मात्र फार कमी करतो. मानसिक आरोग्य तुम्हाला शांत आणि निवांत होण्यास मदत करते. अशावेळी रिकामी होडी आपल्याला बरंच काही शिकवून जाते. मानसशास्त्रज्ञ नेहा रेगे-भाटवडेकर आपल्याला 'एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता' यामधून बरंच काही सांगून जातात. ते नेमकं काय? जाणून घ्या. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Apr 6, 2026, 08:14 PM IST
एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता

World Health Day : 7 एप्रिल रोजी 'जागतिक आरोग्य दिन' साजरा केला जातो. या निमित्ताने मानसशास्त्रज्ञ नेहा रेगे-भाटवडेकर आपल्याला 'एक शांत विचार : रिकामी होडी मानसिकता' या लेखाच्या माध्यमातून विचार करायला लावला आहे. हा विचार जो तुम्हाला मानसिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत करते. 

Add Zee News as a Preferred Source

दिवसाची सुरुवात पहाटे, धुक्याने वेढलेल्या एका शांत सरोवरावर एक वृद्ध साधक होडी सोडतो. वर्षानुवर्षं तो इथे येतो—नवे संकल्प करण्यासाठी नव्हे, तर जुने ओझे उतरवण्यासाठी. पाण्याच्या संथ लाटांवर होडी हळूहळू पुढे सरकत असते. आजूबाजूला निसर्गाची निःशब्दता आणि मनात थोडी शांतता. तेवढ्यात अचानक एक धक्का बसतो. होडी हलते. साधकाचे ध्यान तुटते.

क्षणभर त्याच्या मनात विचारांची गर्दी होते— “नववर्षाच्या सकाळीही कुणाला घाई आहे? इतकं बेफिकीरपणे होडी चालवणारा कोण?” तो रागाने डोळे उघडतो. बोलायला तयार होतो. पण समोर दिसते ती— एक रिकामी होडी. दोऱ्यापासून सुटलेली, वाऱ्याच्या दिशेने वाहत आलेली. कुणाचाही ताबा नाही, कुणाचाही हेतू नाही. त्या क्षणी साधक हसतो. राग विरघळतो. कारण वास्तव स्पष्ट होतं— धक्का होता, पण अपराधी नव्हता.

रिकामी होडी आपल्याला काय शिकवते?

आपल्या आयुष्यातही असंच घडत असतं. आयुष्य जगत असताना आपण अनेक अनुभव सोबत घेऊन येतो. काही कटू शब्द, काही अपूर्ण अपेक्षा, काही अनपेक्षित अडथळे. एखादी व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागत नाही, एखादी योजना फसते, एखादा दिवस आपल्या नियंत्रणाबाहेर जातो. आणि आपण लगेच निष्कर्ष काढतो : “हे मुद्दाम झालं.” “यामागे कुणीतरी जबाबदार आहे.”

खरं तर, बहुतेक वेळा तसं नसतं. आपल्या रागाचं मूळ घटना नसतात, तर त्या घटनेला दिलेला आपला अर्थ असतो. Empty Boat Mindset म्हणजे जबाबदारी टाळणं नव्हे, तर अनावश्यक आरोपांपासून स्वतःला मुक्त करणं. जेव्हा आपण प्रत्येक धक्क्यामागे वाईट हेतू शोधणं थांबवतो, तेव्हा मन हलकं होतं. नववर्ष फक्त कॅलेंडरवर बदलत नाही— जर हा विचार घेऊन पुढे जायचं ठरवलं तर, ते आत बदल घडवायला सुरुवात करेल. 

Empty Boat Mindset : विचारसूत्रे

1. प्रत्येक धक्का मुद्दाम दिलेला नसतो. आपल्या आयुष्यात अनेक घटना अनपेक्षितपणे घडतात. त्या मागे नेहमीच कोणाचा हेतू असतोच असं नाही.

2. राग हा घटनेमुळे नाही, समजुतीमुळे निर्माण होतो. जे घडलं त्यापेक्षा आपण त्याचा अर्थ काय लावतो, हे अधिक प्रभावी ठरतं. चुकीची समजूत मनात अस्वस्थता निर्माण करते.

3. बहुतेक अडथळे ‘रिकाम्या होडी’सारखे असतात. ते आपल्याला त्रास द्यायला आलेले नसतात. ते फक्त जीवनाच्या प्रवाहात घडलेले क्षण असतात.

4. प्रत्येक गोष्ट वैयक्तिक घेणं खरच गरजेचं आहे का? सगळं आपल्या सोबतच घडतय असं मानणं थकवणारं असतं. काही गोष्टी आपल्याशी संबंधित नसतात.

5. ‘रिकामी होडी’ ओळखता आली की मन मोकळं होतं. तेव्हा राग आपोआप विरघळतो. कारण रागवण्यासाठी समोर कुणीच नसतं.

6. जागरूकता म्हणजे खरा बदल. घटना नव्हे, तर आपल्या प्रतिक्रिया पाहणं महत्त्वाचं आहे. जिथे जागरूकता आहे, तिथे अस्वस्थतेला जागा नाही.

भगवद्गीता संदेश संस्कृत श्लोक :

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनिरुच्यते ॥
— भगवद्गीता 2:56

मराठी अर्थ : दुःखात मन न ढळणारा, सुखात आसक्ती न ठेवणारा, राग, भीती आणि द्वेष यांपासून मुक्त असलेला व्यक्ती स्थिर बुद्धीचा मानला जातो.

भावार्थ (Empty Boat Mindset शी जोडलेला): घटना घडतात—त्या आपल्या हातात नसतात. पण त्यावर आपण कशी प्रतिक्रिया देतो, हे पूर्णपणे आपल्या हातात असतं.  जेव्हा आपण अपेक्षा, हेतू आणि दोषारोप सोडतो, तेव्हा समोरची ‘होडी’ रिकामी असल्याचं दिसायला लागतं. आणि मन आपोआप शांत होतं. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More