जागतिक अस्थमा दिवस: 'या' पाच गोष्टींचं सेवन करणं टाळा

...त्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो

Updated: May 5, 2020, 02:22 PM IST
जागतिक अस्थमा दिवस: 'या' पाच गोष्टींचं सेवन करणं टाळा
संग्रहित छायाचित्र

मुंबई : जगभरात असणाऱ्या दमा किंवा अस्थमाच्या रुग्णांमध्ये आणि या विषयी संभ्रम मनात असणाऱ्यांमध्ये याबाबतची जनजागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. 
दमा या आजाराच्या नावातच ‘दम’ लागण्याची क्रिया असल्यामुळे या आजाराची लागण झालेल्या रुग्णाला थोडं काम केल्यानंतरही दम लागतो. सतत खोकला येणं आणि कफ जमा होणे यामुळे त्रासही होतो. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तर कोरडं वातावरण पाहता अनेकदा दमा नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यताही असते. 

दमा किंवा अस्थमाने ग्रासलेल्यांना आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. या रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे त्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो. अशा रुग्णांना ऍलर्जीचा त्रासही लगेच उदभवतो. त्यासाठी खाण्यापिण्यासंबंधी त्यांनी खालील गोष्टी अवश्य ध्यानात ठेवाव्यात..... 

आर्टीफिशिअल स्वीटनर- अस्थमा एँड एलर्जी फाऊंडेशन ऑफ अमेरिकाच्या अहवालानुसार अस्थमाच्या रुग्णांनी आर्टीफिशिअल स्वीटनरपासून दूरच राहणं उत्तम. डाएट सोडा आणि ज्यूसमध्ये याचा वापर केला जातो. यामुळे अनेकदा एलर्जीचं प्रमाणही वाढतं. शिवाय साठवणीतल्या अन्नपदार्थांपासूनही अस्थमा किंवा दम्याच्या रुग्णांनी दूर राहावं. 

प्रोसेस्ड फूड- प्रोसेस्ड फूड किंवा रासायनिक प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागतो. लहान मुलांसाठी हे पदार्थ घातक आहेत. अनेकदा किरणा मालाच्या दुकानांमध्ये असे कित़्येक पदार्थ दिसतात ज्यामध्ये कृत्रिम कॅलरीचा सर्वाधिक वापर असतो. असे पदार्थ अनेकदा धोक्याची सूचना देतात. 

व्हेजिटेबल ऑईल- तेलाच्या या प्रकाराचा वापर सहसा सलाड किंवा केकच्या ड्रेसिंगसाठी केला जातो. यामध्ये असणारी रसायनं शरीरात जळजळ आणि सूज वाढवतात. अस्थमाच्या रुग्णांसाठी हे अतिशय धोकादायक ठरतं. 

तळलेले पदार्थ- शक्त तितकं तळलेल्या पदार्थांपासून दूर राहिल्यास अस्थमाच्या रुग्णांना याचा फायदाच होणार आहे. शिवाय अशा रुग्णांनी मीठाचंही कमीत कमी सेवन करावं. 

 

दुग्धजन्य पदार्थ- दूध किंवा डेरी प्रोडक्ट्स अस्थमाला आणखी बळावतात. ज्यामुळे फुफ्फुसांमध्ये कफ तयार होतो. परिणामी या पदार्थांऐवजी अस्थमाच्या रुग्णांना ग्रीक योगर्ट खाण्याचा सल्ला दिला जातो.