8 तासांच्या प्रयत्नात पहिल्यांदा यशस्वी झालं ब्लॅडर ट्रान्सप्लांट, 7 वर्षांपासून रुग्ण करत होता डायलिसिस, आता मिळाली कायमची सुटका

जगातील पहिले यशस्वी मानवी ब्लॅडर ट्रान्सप्लाट अमेरिकेत करण्यात आलं आहे. गेल्या 7 वर्षांपासून डायलिसिवर अवलंबून असलेल्या रुग्णावर ही शस्त्रक्रिया करण्यात आळी आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 20, 2025, 07:52 PM IST
8 तासांच्या प्रयत्नात पहिल्यांदा यशस्वी झालं ब्लॅडर ट्रान्सप्लांट, 7 वर्षांपासून रुग्ण करत होता डायलिसिस, आता मिळाली कायमची सुटका

Bladder Transplant Success Story: जगात पहिल्यांदाच, डॉक्टरांनी मानवावर मूत्राशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केली आहे. ही ऐतिहासिक कामगिरी कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या केक मेडिसिन इन्स्टिट्यूट आणि अमेरिकेतील सदर्न कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टरांनी केली आहे. ही शस्त्रक्रिया अशा लोकांसाठी एक आशेचा किरण आहे जे दीर्घकाळ डायलिसिसवर अवलंबून आहेत किंवा मूत्राशयाच्या बिघडलेल्या कार्याने ग्रस्त आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया ४ मे रोजी करण्यात आली. ज्यामध्ये युरोलॉजिक ट्रान्सप्लांट सर्जन आणि इन्स्टिट्यूट ऑफ युरोलॉजीच्या संस्थापक संचालक डॉ. नीमा नसिरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या दोन तज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित करण्यात वर्षानुवर्षे घालवली होती.

बहुतेक मूत्राशय निकामी झालं होतं

४१ वर्षीय रुग्णाने ट्यूमर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याच्या मूत्राशयाचा बहुतेक भाग गमावला होता. उरलेला भाग खूपच लहान आणि कमकुवत होता, ज्यामुळे मूत्राशय सामान्यपणे काम करू शकत नव्हते. याशिवाय त्यांना कर्करोग आणि शेवटच्या टप्प्यातील मूत्रपिंडाचा आजारही होता. त्यामुळे दोन्ही मूत्रपिंडे काढावी लागली. गेल्या सात वर्षांपासून तो डायलिसिसवर अवलंबून होता. पण आता त्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

मूत्राशय प्रत्यारोपणाच्या यादीत

आतापर्यंत, ज्या रुग्णांच्या मूत्राशयावर गंभीर परिणाम झाला होता त्यांच्यासाठी आतड्याचा एक भाग मूत्राशय म्हणून वापरणे हा एकमेव पर्याय होता. परंतु ही पद्धत ८०% प्रकरणांमध्ये गुंतागुंत निर्माण करते. जसे की पचनसंस्थेच्या समस्या आणि मूत्रपिंडाच्या कार्यात घट. हे घडते कारण पचनसंस्था आणि मूत्रमार्गाचे सूक्ष्मजीव एकमेकांपासून खूप वेगळे असतात.

का कठीण असते प्रत्यारोपण?

मूत्राशय प्रत्यारोपण करणे कठीण झाले आहे कारण हा अवयव आपल्या पोटाच्या आत खोलवर आढळतो आणि त्यातून जास्त रक्तस्त्राव होतो. या तांत्रिक आव्हानांमुळे, ही प्रक्रिया आतापर्यंत मानवांवर शक्य नव्हती. पण यावेळी, शस्त्रक्रिया सोपी करण्यासाठी, डॉक्टरांनी प्रथम रक्तवाहिन्या एकमेकांशी जोडल्या आणि नंतर दात्याच्या मूत्राशयाला शरीरात विकसित केले.

रुग्णाची प्रकृती सुधारली

सामान्य पुरूषाच्या मूत्राशयात सुमारे ७०० मिली मूत्र साठवता येते, परंतु रुग्णाच्या उर्वरित मूत्राशयाची क्षमता फक्त ३० मिली होती. शस्त्रक्रियेनंतर, रुग्णाची प्रकृती सुधारली आहे आणि ७ वर्षांनी त्याला डायलिसिसपासून आराम मिळाला आहे.

ही शस्त्रक्रिया वैद्यकीय शास्त्रात एक नवीन मैलाचा दगड ठरली आहे. आतापर्यंत हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यासारख्या अवयवांवर उपचार केले जातात. पण आता या यादीत मूत्राशयाचाही समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ तात्पुरत्या उपायांवर अवलंबून असलेल्या लाखो रुग्णांसाठी हा एक आशेच किरण आहे.