BREAKING: हायवेवर बस जळाल्याने 19 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमधून 57 प्रवासी प्रवास करत होते. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बस जैसलमेरमधून निघाली होती.   

शिवराज यादव | Updated: Oct 14, 2025, 11:14 PM IST
BREAKING: हायवेवर बस जळाल्याने 19 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

खासगी बसला आग लागून 19 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना झाली आहे. मंगळवारी जैसलमेरहून राजस्थानमधील जोधपूरला जाणाऱ्या खासगी बसला आग लागली. यानंतर बसमधील 19 जणांचा होरपळून मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 57 प्रवाशांना घेऊन बस दुपारी 3 वाजता जैसलमेरहून निघाली. जैसलमेर-जोधपूर महामार्गावर बसच्या मागच्या भागातून धूर येऊ लागला. यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला थांबवली. परंतु काही क्षणातच संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आली. 

Add Zee News as a Preferred Source

स्थानिक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी आग विझवण्यासाठी आणि बचावकार्यासाठी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी बचावकार्यात मोठी भूमिका पार पाडली. यादरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी प्रवाशांना जैसलमेरमधील जवाहर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. प्रथमदर्शनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असं दिसत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

जैसलमेर जिल्हा प्रशासनाने घटनेची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू केल्याचं सांगितलं. जिल्हाधिकारी प्रताप सिंह यांनी अधिकाऱ्यांना जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश दिले. हेल्पलाइन क्रमांक देखील जारी करण्यात आले आहेत. 

राज्यपाल हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड आणि इतर नेत्यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, जखमींना योग्य वैद्यकीय उपचार आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

"जैसलमेरमध्ये बसला आग लागल्याची घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. या दुःखद अपघातात बाधित झालेल्यांप्रती मी तीव्र संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी आणि पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत," असे मुख्यमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं आहे. 

 

मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची मदत जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसलमेर घटनेवर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, "राजस्थानातील जैसलमेर येथे अपघातात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीबद्दल मी दु:खी आहे. या कठीण काळात पीडित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो." पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबियांना 2 लाखांची आणि जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. 

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More