नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे १९,४५९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८० जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोबाधितांची संख्या आता ५,४८,३१८ इतकी झाली आहे. यापैकी २,१०,१२० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३,२१,७२३ जणांना घरी सोडण्यात आले आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समाधानाची  बाब हीच की रविवारच्या तुलनेत कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या घटली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात एकाच दिवसात १९,९०६ नवे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे भारत २० हजाराचा टप्पा ओलांडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु, सुदैवाने गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांची संख्या थोड्या प्रमाणात का होईना पण घटली आहे. 



महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेले राज्य आहे. रविवारी दिवसभरात महाराष्ट्रात कोरोनाचे ५४९३ नवे रुग्ण आढळून आले होते. आतापर्यंत राज्यात ८६,५७५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात सध्या ७०,६०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  



सध्याच्या घडीला महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात आणि दिल्लीत सध्या कोरोना प्रादुर्भावाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. केंद्रीय पथकाने नुकताच महाराष्ट्राचा दौराही केला होता. यावेळी केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल यांनी, रुग्णांची संख्या वाढली तरी घाबरून जाऊ नका, पण मृत्यूदर नियंत्रणात ठेवा, असे डॉक्टरांना सांगितले होते.