Delhi Teacher Ends Life Over Abuse: दिल्लीमधील केंद्रीय विद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षिकेने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 29 वर्षीय शिक्षिकेचा मृतदेह तिच्या वसुंधरा येथील राहत्या घरात सापडला आहे. मृत्यूपूर्वी या शिक्षिकेने तिच्या पालकांना आणि भावाला पाठवलेल्या मेसेजमधील थक्क करणारा मजकूर समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत शिक्षिकेचं नाव अनविता शर्मा असं असून तिने आत्महत्येपूर्वी माहेरच्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये मी आता यापुढे नवऱ्याचे टोमणे सहन करु शकत नाही. "माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला दोष दिसतात," असं अनविताने म्हटलं आहे. अनविताने तिच्या सासरच्या लोकांचं वर्णन करताना, "या कुटुंबाला केवळ ओरबाडणं माहिती आहे," असं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये अनविताच्या पतीसहीत दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनविताची सासू मंजू फरार आहे.
अनविताने स्वत:ला संपवण्यापूर्वी माहेरच्यांना पाठवलेल्या मेसेजमध्ये संताप व्यक्त करताना थेट पतीचा उल्लेख केला आहे. "मी जेवण करुन ठेवलं आहे. गौरव कौशिक कृपया ते खाऊन घेणे," असं तिने म्हटलं आहे. गौरव हा दिल्लीमध्ये एक नामांकित डॉक्टर असून त्याचे वडील सुरेंद्र शर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे. अनविताच्या माहेरच्यांनी हुंड्यासाठी मुलीचा छळ करण्यात आल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अनविताच्या पती आणि सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
इंद्रपुरमचे एसीपी अभिषेक श्रीवास्तव यांनी हा सारा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती दिली. गौरव आणि मयत अनविताचा मुलगा घराबाहेर असताना तिने स्वत:ला संपवलं. "तिचा मेसेज मिळाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तातडीने तिला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तातडीने गौरवला याबद्दल कळवलं. तो घरी पोहोचला तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यांनी खिडकीच्या जाळ्या कापून घरात प्रवेश केला," असं पोलिसांनी सांगितलं.
गौरव आणि अनविताचं लग्न 12 डिसेंबर 2019 रोजी झालं होतं. या दोघांना चार वर्षाचा मुलगा आहे. अनविता ही ऑक्टोबर 2019 पासून शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. "त्याने माझ्या नोकरी लग्न केलं होतं माझ्याशी नाही," असं अनविताचं म्हणणं होतं. "माझ्या पतीला सुंदर, कष्ट करणारी आणि नोकरी असणारी पत्नी हवी होती. मला जे शक्य आहे ते सर्व काही मी केलं. मात्र त्याला ते कधीच पुरेसं वाटलं नाही. त्यांना असं कोणीतरी हवं होतं जे फक्त सासारच्या लोकांकडे लक्ष देईल. मात्र मला माझे पालक आणि भाऊही महत्त्वाचे आहेत. माझ्या नवऱ्याने मागील पाच वर्षात मला जेवढे टोमणे मारलेत तेवढे कोणत्या सासूनेही मारले नसतील. मी केलेल्या प्रत्येक गोष्टीत त्याला फक्त दोष दिसायचे," असं अनविताने म्हटलं आहे.
माझ्या सासरच्यांना केवळ, 'नोकरी करणारी मोलकरीण हवी होती' असंही अनविताने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. "मला आता मी आनंदी असल्याचं दाखवण्याचाही कंटाळा आला आहे. माझ्या नवऱ्याला माझी बँक खाती, चेकबूक आणि सगळ्याचा अॅक्सेस आहे. माझ्या मुलाची काळजी घ्या. मी या जगात माझ्या मुलावर सर्वाधिक प्रेम करते. त्याला तुमच्यासोबतच ठेवा," असं अनविताने तिच्या पालकांना व्हॉट्सअपवर पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. "तो त्याच्या वडिलांसारखा होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे," असं अनविताने तिच्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हटलं आहे.
अनविताचे वडील अनिल शर्मा यांनी दाखल केलेल्या पोलीस तक्रारीनुसार एफआयआर दाखल कऱण्यात आला आहे. शर्मा यांनी अनविताच्या लग्नासाठी 26 लाखांचा खर्च केला होता. त्यांनी अनविताच्या लग्नात घरातील जवळपास सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. त्यांनी मुलीच्या अंगावर सोनंही चढवलं होतं. लग्नाच्या वेळेस अनविताच्या सासरच्यांनी कारचीही मागणी केली होती. तिच्या वडिलांनी यानंतर निळ्या रंगाची डिझायर कार जावयाला घेऊन दिली होती.