नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजप सत्तेत राहणार किंवा जाणार, याविषयी सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. निवडणूक रणनीती तज्ज्ञ प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून मोदी पंतप्रधानपदी कायम राहणार असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. गेल्या चार वर्षांमध्ये मोदींची लोकप्रियता घटली असली तरी काही कारणांमुळे भाजपची सत्ता अबाधित राहण्याचीच शक्यता जास्त आहे. काय आहेत ही कारणे याचा घेतलेला आढावा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


विरोधकांमध्ये एकीचा अभाव- काँग्रेससह देशातील सर्वच विरोधी पक्षांकडून भाजपला सत्तेतून दूर सारण्याच्या गर्जना वारंवार केल्या जातात. मात्र, यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, या विरोधी आघाडीचे नेतृत्त्व कोणाकडे असेल, यावरुन अद्याप एकमत झालेले नाही. याशिवाय, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाबाबत विरोधकांना साशंकता आहे. शरद पवार, ममता बॅनर्जी, मायावती आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे ज्येष्ठ नेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करण्यास राजी होण्याची शक्यता फारच कमी आहे.



दुसऱ्या क्रमांकाच्या जागांकडून अपेक्षा- आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमधील भाजपच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याचवेळी पश्चिम बंगाल, आसाम आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये भाजपला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच गेल्या निवडणुकीत ज्या जागांवर भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती, त्याठिकाणी पक्षाला विजय मिळू शकतो, असा विश्वास भाजप नेत्यांना वाटतो. प्रत्यक्षात तसे घडल्यास भाजपला फायदा होऊ शकतो. 


सरकारच्या महत्त्वकांक्षी योजना आणि ध्रुवीकरण- मोदी सरकारने गाजावाजा करुन राबविलेल्या अनेक सरकारी योजनांच्या जोरावर भाजपचे नेते मतदारांना साद घालू शकतात. याशिवाय, राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर झालेल्या ध्रुवीकरणाचाही भाजपला फायदा मिळू शकतो. 


समविचारी संघटनांचा पाठिंबा- इतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या तुलनेत भाजपशी संलग्न असलेल्या संघटनांचे जाळे मजबुत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बजरंग दल, स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघटना यांच्या माध्यमातून भाजपला आपला अजेंडा जनतेपर्यंत नेण्यास मदत होऊ शकते. 


भाजपचे पॉलिटिकल मॅनेजमेंट- अनेक सर्वेक्षणांनुसार भाजपची कामगिरी खालावत चालली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पक्षाला फारसे यश मिळणार नाही, असा कल अनेक मतदानपूर्व चाचण्यांनी वर्तवला आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा हुकमी एक्का आणि प्रभावी पॉलिटिकल मॅनेजमेंटच्या जोरावर भाजप २०१९ मध्ये बहुमताचा आकडा गाठेलच, असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे.