Indian Railway: हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने 8 जण जिवंत जळाले; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
Jharkhand Electrocution: झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये झालेल्या या भीषण अपघातानंतर एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता यामध्ये आठ मजुरांचा जळून जागीच कोळसा झाला आहे. तर इतर मजूरदेखील चांगलेच भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Jharkhand Indian Railway Electrocution: झारखंडच्या (Jharkhand) धनबादमध्ये एक भीषण अपघात झालाय. हाय टेंशन वायरच्या संपर्कात येऊन 8 मजुरांचा जळून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत हे मजूर असून ते धनबाद आणि गोमो स्थानकांदरम्यान निश्चितपूर रेल्वे फाटकजवळ खांब उभारण्याचे काम करत होते. पोल बसवताना हे सर्वजण 25 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनबाद रेल्वे विभागाच्या हावडा-नवी दिल्ली मार्गावरील धनबाद-गोमो स्थानकादरम्यान निश्चितपूर रेल्वे गेटजवळ खांब उभारण्याचे काम सुरू होते. पोल बसवताना रेल्वेच्या 25000 व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आल्याने रेल्वेच्या मजूरांना आपला जीव गमवावा लागला. अपघात एवढा भीषण होता की आठ जणांचा जागीच कोळसा झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दुपारी साडेअकराच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, झारखोरजवळ धनबाद-गोमो रेल्वे विभागात डझनभर मजूर पोल उभारण्याचे काम करत होते. त्यानंतर हा पोल 25 हजार व्होल्टच्या हाय टेंशन वायरच्या संपर्कात आला. 25 हजार व्होल्ट विजेचा झटका बसल्याने क्षणातच आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य जण चांगलेच भाजले गेले.
मृतांमध्ये संजय भुईया, पलामू येथील गोविंद सिंग, पलामू येथील श्याम सिंग आणि अलाहाबाद येथील सुरेश मिस्त्री यांचा समावेश आहे. तर इतर मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अपघात स्थळाची पाहणी केली. या अपघातात निशा कुमारी नावाची मुलगीही जखमी झाली आहे. ती जवळच्या हातपंपावरुन पाणी भरत होती. धक्कादायक बाब म्हणजे पोल उभारण्याचे काम सुरु असताना विजेचा प्रवाह बंद करण्यात आला नव्हता. त्यामुळे मजुरांना विजेचा जबर झटका बसला आणि आठ जणांनी जीव गमावला. तर या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
ठेकेदाराने काढला पळ
दरम्यान, या घटनेनंतर हे काम घेणाऱ्या ठेकेदाराने तिथून पळ काढला आहे. या घटनेमुळे हावडा-नवी दिल्ली रेल्वे मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. हावडा-बिकानेर एक्स्प्रेस धनबाद स्थानकावर थांबवण्यात आली आहे. तर कालका-हावडा नेताजी एक्स्प्रेस तेतुलमारी स्थानकावर थांबवण्यात आली आहे.