भाडेकरुला 7 फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं, तीन महिन्यांनी उघड झालं रहस्य; कारण ऐकून पोलीस हादरले

45 वर्षीय जगदीप याचा हत्येच्या तीन महिन्यानंतर मृतदेह सापडला आहे. जगदीप हा बाबा मस्तनाथ युनिव्हर्सिटीत काम करत होता.   

शिवराज यादव | Updated: Mar 26, 2025, 07:52 PM IST
भाडेकरुला 7 फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं, तीन महिन्यांनी उघड झालं रहस्य; कारण ऐकून पोलीस हादरले

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून एका व्यक्तीने आपल्या भाडेकरुची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हरियाणात ही घटना घडली असून, आरोपीने गतवर्षी डिसेंबर महिन्यात भाडेकरुला जिवंतच सात फूट खोल खड्ड्यात गाडलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फिजिओथेरपिस्ट असणाऱ्या पीडिताचा मृतदेह हत्येच्या तीन महिन्यानंतर सोमवारी खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. 

पोलिसांनी सांगितलं आहे की, पीडित जगदीप (45) हा रोहतकचा रहिवासी आहे. तो बाबा मस्तनाथ विद्यापीठात काम करत होता आणि गेल्या तीन वर्षांपासून जनता कॉलनीतील कमला नावाच्या व्यक्तीच्या भाड्याच्या घरात राहत होता. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटवास येथील रहिवासी हरदीप (36) आणि शेतकरी धरमपाल (58) अशी झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी असणाऱ्या राजकरणचं कमला यांची मुलगी दीपा हिच्याशी लग्न झालं होतं. पत्नीची जगदीपशी असणारी मैत्री पाहून त्याला त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याचा संशय आला होता. तपासकर्त्यांनी सांगितले की, त्याने गेल्या वर्षी 24 डिसेंबर रोजी चरखी दादरी जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी पेंटावस येथे दोन पुरुषांच्या मदतीने एका तलावाजवळ खड्डा खोदला होता. "ते रोहतक येथील जगदीपच्या घरी पोहोचले, त्याला मारहाण केली आणि एका वाहनातून पेंटावस येथे आणले जिथे त्यांनी त्याला जिवंत गाडले," असं एका अधिकाऱ्याने सांगितलं.

रोहतकचे सहाय्यक पोलिस अधीक्षक वाय व्ही आर शशी शेखर म्हणाले की, एका उपनिरीक्षकाला चरखी दादरी येथे रोहतकमधील एका रहिवाशाच्या हत्येची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रोहतकमधील बेपत्ता व्यक्तींची माहिती गोळा  करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना जगदीप डिसेंबरमध्ये त्याच्या घरातून बेपत्ता झाला असल्याचं लक्षात आलं. 

जगदीपच्या काकांनी त्याला चुकीच्या पद्धतीने ठेवल्याचा आरोप करत केलेल्या तक्रारीच्या आधारे 3 फेब्रुवारी रोजी एफआयआर दाखल करण्यात आला होता असंही तपासकर्त्यांच्या लक्षात आलं. तपासादरम्यान, पोलिसांना त्याचं अपहरण करून हत्या करण्यात आली असल्याचं आढळलं.

यानंतर राजकरणला मदत करणाऱ्या गावकऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांनी जगदीपला पुरण्यासाठी खड्डा खोदण्यात मदत केली  होती. मृतदेह सापडल्यानंतर, मंगळवारी रोहतकच्या पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीजीआयएमएस) येथे पोस्टमॉर्टम करण्यात आला.

दरम्यान राजकरण आणि त्याच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. आरोपींवर खून आणि अपहरणासह विविध आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.