'बाबा आम्हाला सोडा', ट्रेन समोरुन धावत येत असतानाही बापाने चार मुलांचा हात सोडला नाही; कारण त्यापेक्षाही हादरवणारं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनोज महतो रोजंदारीवर काम करतो. पत्नीने दिलेल्या जबाबानुसार, तिचे संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केलं असावं.   

शिवराज यादव | Updated: Jun 12, 2025, 10:23 PM IST
'बाबा आम्हाला सोडा', ट्रेन समोरुन धावत येत असतानाही बापाने चार मुलांचा हात सोडला नाही; कारण त्यापेक्षाही हादरवणारं

फरिदाबादमधील बल्लभगड येथे ट्रेनखाली येऊन 36 वर्षीय व्यक्तीसाह चार मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी हा हत्या-आत्महत्या असावी असा संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज महतो असं मृत व्यक्तीचं नाव असून तो रोजंदारीवर काम करायचा. पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. त्याच्या पत्नीने स्वत: ही माहिती दिली आहे. 

मनोज महतोने पत्नीला आपण चारही मुलांना सुभाष कॉलनीत घराशेजारी असणाऱ्या पार्कात घेऊन जात असल्याचं सांगितलं होतं. या चार मुलाचं वय तीन, सहा, नऊ आणि दहा होतं. मनोज मुलांना पार्कात घेऊन जाण्याऐवजी 200 मीटर दूर रेल्वे ट्रॅकवर घेऊन गेला. 12.30 च्या सुमारास मनोज अशोक चौकात फ्लायओव्हरच्या खाली असणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर पोहोचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज महतो मुलांसह ट्रेनची वाट पाहत थांबला होता. त्याने मुलांसाठी वेफर, कोल्ड्रिंक आणलं होतं. 

"ते जिथे थांबले होते, ती जागा रस्त्यावरुन दिसत नव्हती. ते रेल्वे ट्रॅकवर बसलेले होते. गोल्डन टेम्पल एक्स्प्रेस येताच मनोजने मुलांना घट्ट पकडून ठेवलं," अशी माहिती फरिदाबाद सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशन हाऊस ऑफिसर राज पाल यांनी दिली आहे. ट्रेन सर्वांच्या अंगावर धावली. यादरम्यान मुलं ओरडत होती, पण आतील परिसर असल्याने कोणीही त्यांचा आवाज ऐकू शकलं नाही असं पोलीस म्हणाले आहेत. 

लोको पायलटने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी महतो आणि त्याच्या बायकोचं आधार कार्ड सापडलं. त्यावरील माहितीच्या आधारे पोलिसांनी पत्नीशी संवाद साधला. पत्नी घटनास्थळी पोहोचल्यानंतर मृतदेह पाहिल्यानंतर बेशुद्ध पडली. मृतदेह बादशाह खान सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहेत.

"प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे की, पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. पत्नीना फोनवरुन इतर पुरुषांशी बोलताना त्याला विवाहबाह्य संबंधाचा संशय येत असे. सध्या तरी हाच हेतू दिसत आहे," असं राज पाल यांनी सांगितलं आहे.

"अद्यापपर्यंत कोणताही एफआयआर किंवा तक्रार दाखल झालेली नाही. कथित हेतू फक्त पत्नीनेच सांगितला आहे. आम्ही सध्या तिच्याशी बोलत आहोत," असं फरीदाबादचे जीआरपी उपपोलिस अधीक्षक राजेश कुमार चेची म्हणाले.