)
सध्या संपूर्ण देशभरात रक्षाबंधन सणाचा उत्साह असून, बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी होत आहे. एकीकडे बहिणी आपल्या भावांसाठी आकर्षक राखी शोधत असून, दुसरीकडे भाऊ भेटवस्तू खरेदी करण्यासाठी दुकानांना भेट देत आहेत. मिठाईची दुकानंही ग्राहकांनी फुललीआहे. यादरम्यान आंध्र प्रदेशात एका बहिणीने आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. 24 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचललं असून, त्याआधी आपल्या भावासाठी पत्र लिहिलं आहे.
तरुणीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या भावाला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसंच मी तुला यावेळी राखी बांधू शकणार नाही असंही म्हटलं आहे. "माझ्या लहान भावा, काळजी घे. यावेळी मी तुला राखी बांधू शकणार नाही".
श्रीविद्या असं या तरुणीचं नाव असून एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम करत होती. गावातील सर्वेक्षक रामबाबू यांच्याशी लग्न केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच तिने आत्महत्या केली. तिने चिठ्ठीत लग्नाच्या अवघ्या एका महिन्यात झालेल्या छळाचा उल्लेख केला आहे.
चिठ्ठीत तिने कशाप्रकारे क्रूर पद्धतीने आपला छळ करण्यात आला याचं वर्णन केलं आहे. श्रीविद्याने चिठ्ठीत लिहिलं आहे की, रामबाबू दारू पिऊन घरी परतायचा आणि तिच्यावर शारीरिक अत्याचार करायचा. तसंच आपल्याला शिवीगाळ करत शाब्दिक छळही करत असे. तसंच तो इतर महिलांसमोर निरुपयोगी म्हणत तिची थट्टा कशी करायचा आणि बेडवर डोके आपटून आणि पाठीत ठोसा मारून मारहाण करायचा असं तिने सांगितलं आहे.
श्रीविद्याने असह्य छळ आणि मारहाण सहन न झाल्याने कठोर पाऊल उचलल्याचे वृत्त आहे. स्थानिक अधिकाऱ्यांना कळविण्यात आलं असून, श्रीविद्येच्या मृत्यूच्या परिस्थितीची चौकशी केली जात आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी बंगळुरुत एका बहिणीने आणि तिच्या पतीने तिच्याच भावाची गळा दाबून निर्घृण हत्या केली. मृत तरुण गंभीर आजाराने ग्रस्त होता आणि आरोपी नातेवाईकांना भीती होती की यामुळे गावात त्यांची बदनामी होईल. याच कारणामुळे त्यांनी त्याची हत्या केली.
मृत तरुणाचे नाव मल्लिकार्जुन असे आहे. मल्लिकार्जुन बेंगळुरूमधील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता आणि 23 जुलैच्या रात्री त्याच्या मित्रांसह घरी परतत होता. वाटेत एका भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. कुटुंबीयांनी त्याला ताबडतोब दावणगेरे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले, जिथे उपचारादरम्यान, डॉक्टरांनी त्याची रक्त तपासणी केली आणि सांगितले की, त्याला HIV आजाराची लागण झाली आहे.
मल्लिकार्जुनची प्रकृती गंभीर होती आणि डॉक्टरांनी त्याला चांगल्या उपचारांसाठी प्रगत वैद्यकीय सुविधेत हलवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर, २५ जुलै रोजी त्याला कारने मणिपाल रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याची बहीण निशा आणि मेहुणा मंजुनाथ हे देखील त्याच्यासोबत गाडीत होते. पण वाटेत दोघांनीही पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून त्याचा गळा दाबून खून केला. त्यांना वाटले की जर मल्लिकार्जुनच्या आजाराची बातमी गावात पसरली तर संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा कलंकित होईल.