चांद्रयान-3 नंतर भारत आता थेट मानवाला अवकाशात पाठवणार; `गगनयान` मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी
भारतीय अंतराळवीर थेट अवकाशात झेप घेणार. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वी झाला आहे.
ISRO Gaganyaan : भारताचे चांद्रयान-3 (Chandrayaan-3) हे 14 जुलै रोजी अवकाशात झेपावले आहे. चांद्रयान-3 हे नियोजीत पद्धतीने एक एक टप्पा पार करत आहे. चांद्रयान-3 मोहिमेसोबतच भारतीय अंतराळ संशोधन संस्था (Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्रो (ISRO) आणखी एक मोहिम फत्ते करण्याचा प्रयत्न करत आहे. चांद्रयान-3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताच्या गगनयान अंतराळ मोहीमेचा (ISRO Gaganyaan Mission) महत्वाचा टप्पा पार पडला आहे. गगनयानच्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागाची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे मानवाला अवकाशात पाठवण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे.
एकीकडे चांद्रयान -3 मोहीम मार्गी लागली असतांना इस्रोची 'गगनयान' मोहिमेची तयारी जोरात सुरू आहे. या मोहिमेंतर्गत देशाचे अंतराळवीर इस्रो स्वबळावर अवकाशात पाठवणार आहे. 3 भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवण्यासाठी इस्रोची तयारी विविध पातळीवर सुरू आहे.
गगनयानच्या इंजिनाच्या महत्त्वाच्या भागाची चाचणी यशस्वी
इस्रोच्या गगनयान सर्व्हिस मॉड्युल प्रोपल्शन सिस्टीम (Service Module Propulsion System) ची चाचणी यशस्वी झाली आहे. गगनयानचे सर्व्हिस मॉड्युल एक नियंत्रित द्वि-प्रोपेलेंट आधारित प्रणाली आहे. जी ऑर्बिटल मॉड्यूलच्या गरजा पूर्ण करते. यामध्ये ऑर्बिट इंजेक्शन, परिक्रमा, ऑन-ऑर्बिट कंट्रोल, डी-बूस्ट मॅन्युव्हरिंग आणि चढाईच्या टप्प्यात मदत करते. इस्रोने ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
सर्व्हिस मॉड्यूल सिस्टीम (SMPS) म्हणजे काय?
सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीम हे अंतराळयानाचे इंजिनच आहे. हे मुख्य प्रोपल्शन इंजिन असते. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये सिस्टीमच्या मदतीने अंतराळयानाला चंद्राभोवती कक्षेत ठेवण्यासाठी आणि चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने पाठवण्यासाठी मदते करते.
अंतराळवीर 3 दिवस अंतराळात राहणार
गगनयान मोहिमे अंतर्गत अंतराळवीर 3 दिवस अंतराळात राहणार आहेत. यानंतर अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहे. या मोहिमेसाठी वेगवेगळ्या चाचण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. ज्यामध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट, टेस्ट व्हेईकल मिशन्स, पॅड अॅबॉर्ट टेस्ट, मानवरहित उड्डाण या चाचण्या करण्यात येतील. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर भारत गगनयानातून मानवाला अंतराळात पाठवणार आहे.
कोण आहे 'गगनयाना'चा पहिला प्रवासी?
इस्रोनं या मोहिमेसाठी ही खास हाफ ह्युमनाईड रोबो तयार केला आहे. 'व्योममित्रा' असं या रोबोटचे नाव आहे. तिला पाय नाहीत. पण एका जागी बसून एक मानव करू शकतो ती सर्व कामं व्योममित्रा करू शकते. पहिल्या अंतराळ मोहिमेदरम्यान लाँचिंग, ऑर्बिटिंगसाठी पॅनल ती ऑपरेट करू शकेल. तसंच अंतराळवीरांना होऊ शकणारा संभाव्य त्रास, शून्य गुरूत्वाकर्षणात येणारे अनुभव, ऑक्सिजनचं प्रमाण इत्यादीची नोंदही व्योममित्रा ठेवणार आहे.