गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Gujarat New Cabinet: गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सर्व मंत्र्यांना त्यांच्या घरी बोलावून राजीनामे स्वीकारले आहेत.  

शिवराज यादव | Updated: Oct 16, 2025, 05:04 PM IST
गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून सर्व 16 मंत्र्यांचा राजीनामा

Gujarat New Cabinet: दिवाळीच्या अगदी आधी गुजरात मंत्रिमंडळात मोठा फेरबदल झाला आहे. रिपोर्टनुसार, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुरुवारी रात्री 8 वाजता सर्व मंत्र्यांना त्यांच्या निवासस्थानी परत बोलावलं आहे. नवीन मंत्र्यांचा शपथविधी शुक्रवारी 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता होणार आहे. गांधीनगर येथील महात्मा मंदिरात केंद्री गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. सरकारने प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचं मंत्रिमंडळ शुक्रवारी 12.30 ला विस्तारित होईल. सर्व भाजपा आमदारांनाही गुरुवारपर्यंत गांधीनगरमध्ये येण्यास सांगण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source

गुजरात सरकारमधील बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ फेरबदल अखेर झाला आहे. वृत्तानुसार, मंत्रिमंडळात जुन्या चेहऱ्यांऐवजी तरुण आणि नवीन नेत्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, शुक्रवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. राज्य सरकारला तीन वर्षं पूर्ण होत असतानाच हा बदल केला जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या काही महिन्यांपूर्वीच मंत्रिमंडळात फेरबदल होत आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री उशिरा किंवा शुक्रवारी सकाळी नवीन मंत्र्यांची नावे जाहीर केली जाऊ शकतात. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल गुरुवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांची भेट घेतील आणि त्यांना पक्षाच्या राज्य संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात. यामुळे पक्ष आणि सरकारमधील समन्वय मजबूत होईल. भाजपने अलीकडेच जगदीश विश्वकर्मा यांची गुजरातचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. "एक व्यक्ती, एक पद" या तत्त्वानुसार, विश्वकर्मा यांनी राज्य सहकार विभागाच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असावा.

मंत्रिमंडळ विस्तारात 10 नवीन मंत्री मिळण्याची शक्यता

आगामी मंत्रिमंडळ विस्तारात राज्याला सुमारे 10 नवीन मंत्री मिळू शकतात, असं भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने आधी पीटीआयला सांगितलं होतं. सध्याच्या मंत्र्यांपैकी जवळजवळ निम्मे मंत्री बदलले जाऊ शकतात, असं त्यांनी सांगितलं. 

रिपोर्टनुसार, धर्मेंद्रसिंह, ऋषिकेश पटेल, मुकेश पटेल आणि भूपेंद्रसिंह चुडासामा यांचं मंत्रीपद कायम राहू शकतं. तर कनुभाई देसाई (वित्त), राघवजी पटेल (कृषी), कुंवरजी बावलिया (पाणीपुरवठा) आणि मुरुभाई बेरा (पर्यटन) यासारख्या मंत्र्यांना वगळले जाऊ शकते.

सध्याच्या गुजरात मंत्रिमंडळात मुख्यमंत्री पटेल यांच्यासह 17 मंत्र्यांचा समावेश आहे. आठ कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत, तर इतर तितकेच राज्यमंत्री (राज्यमंत्री) आहेत.  

गुजरातमध्ये 182 सदस्यांची विधानसभा 

182 सदस्यांची विधानसभा असलेल्या गुजरातमध्ये 27 मंत्री किंवा सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्के मंत्री असू शकतात. या महिन्याच्या सुरुवातीला, गुजरात सरकारमधील राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा हे केंद्रीय मंत्री सीआर पाटिल यांच्या जागी भारतीय जनता पक्षाच्या राज्य युनिटचे नवे अध्यक्ष बनले. भूपेंद्र पटेल यांनी 12 डिसेंबर 2022 रोजी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More