)
तेलंगणाचे डीएसपी संकीरेड्डी भीम रेड्डी यांच्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून धाडी टाकण्यात आल्यानंतर चक्रावून टाकणारी संपत्ती समोर आली आहे. यानंतर उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून संकीरेड्डी भीम रेड्डी यांना अटक करण्यात आली आहे. ACB ने संकीरेड्डी भीम रेड्डी यांच्याशी संबंधित एकूण 16 ठिकाणी धाडी टाकल्या.
संकीरेड्डी भीम रेड्डी हैदराबाद येथील 'पोलीस कॉम्प्युटर सर्व्हिसेस' (PCS) विभागात पोलीस उपाधीक्षक म्हणून कार्यरत होते. इब्राहिमबाग परिसरातील 'वेसेला मेडोज' (Vessella Meadows) येथील त्यांच्या निवासस्थानावरून सायंकाळी 7.40 च्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना एसीबीच्या (ACB) विशेष न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.
एसीबीच्या म्हणण्यानुसार, सेवेदरम्यान भ्रष्टाचार आणि संशयास्पद मार्गांचा अवलंब करून त्यांनी आपल्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती (अवैध मालमत्ता) जमा केली आहे. तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये या अधिकाऱ्याचे निवासस्थान तसंच त्यांचे नातेवाईक, मित्र, कथित 'बेनामीदार' आणि सहकारी यांच्याशी संबंधित 15 इतर ठिकाणांवर एसीबीने एकाच वेळी छापे टाकल्यानंतर काही दिवसांतच ही अटक करण्यात आली आहे.
1) वेसेला मेडोज, इब्राहिमबाग, हैदराबाद येथे एक व्हिला,
2) टेलिकॉम नगर येथे दोन मजल्यांचं पेंटहाऊस
3) टेलिकॉम नगरमधील साई प्रभा रेसिडेन्सीमध्ये एक फ्लॅट,
4) गाचीबोवली येथील क्रांती सिऑन (Kranti Ceon) अपार्टमेंट्समध्ये एक फ्लॅट,
5) मणिकोंडा येथील लँकोहिल्स रोडवर 500 चौरस यार्ड क्षेत्राच्या पाच मजल्यांच्या व्यावसायिक संकुलातील हिस्सा
6) मणिकोंडा मरिचेट्टू जंक्शनजवळ 3000 चौरस फूट क्षेत्राची व्यावसायिक जागा,
7) तेल्लापूर येथील अभिनंदा रेसिडेन्सीमध्ये दोन निवासी फ्लॅट्स
8) प्रगती रिसॉर्ट्स येथे 500 चौरस यार्डचा एक मोकळा भूखंड
9) झहीराबाद, संगारेड्डी येथे 3.5 एकर शेतजमीन
10) कर्नाटकमध्ये 6 एकर शेतजमीन
11) कर्नाटकमध्ये आणखी 38 एकर शेतजमीन
12) देवनहल्ली, बंगळुरू येथे एक एकर जमीन,
13) नागोल येथील कामिनेनी हॉस्पिटलजवळ 200 चौरस यार्डचा एक मोकळा भूखंड
14) पाटनचेरू येथील जीपीआर (GPR) हाउसिंग सोसायटीजवळ 400 चौरस यार्डचा एक मोकळा भूखंड
15) पाटनचेरू येथे 200 चौरस यार्डचा एक मोकळा भूखंड
16) मोमिनपेट, विकाराबाद येथे 1000 चौरस यार्ड जमिनीचा तुकडा
17) मोमिनपेट, विकाराबाद येथे 2 एकर शेतजमीन
18) मेसर्स श्री राघवेंद्र रॉक सँड मिनरल्समध्ये 75 लाखांची गुंतवणूक
19) मुचिंताला गाव, सीसी कुंटा (CC Kunta) येथे 4-20 एकर शेतजमीन आढळून आली.
छापा टाकला असता अधिकाऱ्याच्या घरातून सुमारे 3.60 लाख रुपये रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्याच्या एका बेनामी व्यक्तीच्या घरातून आणखी 40 लाख रुपये रोख रक्कम सापडली. याशिवाय, सुमारे 2 किलो सोन्याचे दागिने आणि 20 किलोच्या चांदीच्या वस्तूही आढळून आल्या. तसंच बँकेत सुमारे 19 लाख 91 हजार रुपयांचा बॅलेन्स असल्याचंही आढळून आलं.
एसीबी अधिकाऱ्यांना डीसीपीने हाताने लिहिलेली एक डायरीही सापडली आहे. भीम रेड्डी यांनी मे महिन्यात आपल्या पत्नीसोबत चार धाम यात्रेला निघण्यापूर्वी ही डायरी लिहिली होती आणि त्यात मालमत्ता, गुंतवणूक, देणी आणि कथित बेनामीदारांची नावे नमूद होती. तपासकर्त्यांनी सांगितले की, यात्रेला निघण्यापूर्वी डायरीच्या स्कॅन केलेल्या प्रती व्हॉट्सॲपद्वारे त्याच्या दोन मुलांसोबत शेअर करण्यात आल्या होत्या. अधिकाऱ्यांनी या डायरीला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातील एक महत्त्वाचा पुरावा म्हटले आहे, आणि सांगितले की यामुळे त्यांना अनेक मालमत्ता आणि आर्थिक संबंधांचा शोध घेण्यास मदत झाली.