तिरुवनंतपुरम: लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी आम्हाला राजकारण शिकवण्याच्या फंदात पडू नये. त्यांनी स्वत:च्या कामात लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी केली. ते शनिवारी तिरुवनंतपुरम येथील सभेत बोलत होते. लष्करप्रमुखांनी नुकतेच नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्यांना लक्ष्य केले होते. आपण सध्या शहरांमध्ये विद्यापीठ, महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांची हिंसक आंदोलने पाहत आहोत. पण लोकांना चुकीच्या दिशेने घेऊन जाणारे चांगले नेते नसतात, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजच्या सभेत पी.चिदंबरम यांनी लष्करप्रमुखांच्या या वक्तव्याचा  समाचार घेतला. त्यांनी म्हटले की, आजकाल लष्करप्रमुख सरकारला पाठिंबा देण्याची भाषा बोलत आहेत. ही शरमेची बाब आहे. माझे लष्करप्रमुख रावत यांना इतकेच सांगणे आहे की, तुम्ही लष्कराचे नेतृत्व करता, त्याच कामाकडे लक्ष द्यावे. आम्ही तुम्हाला युद्ध कसे लढावे, हे सांगत नाही. त्याचप्रमाणे राजकारण्यांनी काय करायला पाहिजे, हे आम्हाला सांगणे लष्कराचे काम नव्हे. तुम्ही तुमच्या रणनीतीप्रमाणे युद्ध लढता. तसेच आम्ही देशाचे राजकारण चालवतो, असे पी.चिदंबरम यांनी सांगितले. 




लष्करप्रमुख बिपीन रावत ३१ डिसेंबरला लष्करप्रमुखपदावरून निवृत्त होत आहेत. यानंतर रावत यांची 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' अर्थात तिन्ही सेनादलांच्या प्रमुखपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून त्यांच्यावर पक्षपाती भूमिका घेतल्याची टीका करण्यात येत आहे.