Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि मागोमाग थाटामाटात झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सर्वसामान्य भाविकांसाठी मंदिरात दर्शनाची सुरुवात झाली. दर दिवशी मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी या मंदिर परिसरात पाहायला मिळाली. राम मंदिरामुळं अयोध्यानगरीसुद्धा फुलून निघाली. इथं पर्यटनाला वेग मिळाला आणि रातोरात चित्र बदलण्यास सुरुवात झाली. ही झाली नाण्याची एक बाजू. पण, जे राम मंदिर जगभरात चर्चेचा विषय आहे, त्याच राम मंदिरात पहिल्या पावसानंतर दिसणारं चित्र काहीसं अपेक्षाभंग करणारं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाण्याची दुसरी बाजू काहीशी त्रासदायक आहे हेच राम मंदिरातील सद्यस्थितीमुळं लक्षात येत आहे. उत्तर भारतात आतापर्यंत पावसानं हजेरी लावली नव्हती. पण, आता, जेव्हा पाऊस उत्तर भारतामध्ये धडकला आहे, तेव्हाच या पहिल्या पावसानं राम मंदिरालाही चिंब भिजवलं आहे. इतकंच नव्हे, तर या मंदिराच्या छतातून थेट रामलल्लाच्या गाभाऱ्यापर्यंत पाणी पाझरत असल्याचा दावा मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनी केला आहे. 


मुख्य पुजारी म्हणतात... 


राम मंदिराचे मुख्य पुजारी, आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिराच्या छतातून होणारी गळती पाहता तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. जिथं प्रभू श्रीराम विराजमान आहेत, तिथंही पाणीच पाणी झाल्यामुळं त्यांनी निराशेचा सूर आळवला आहे. परिस्थिती पाहता तातडीनं उपाययोजना राबवण्यात आल्या नाही आणि ही पाणीगळती थांबली नाही, तर दर्शनरांगही थांबवावी लागू शकते असा काहीसा चिंतेचा सूर त्यांनी आळवला. 


आचार्य सत्येंद्र दास यांच्या माहितीनुसार शनिवारी मध्यरात्री पहिला पाऊस झाला त्याचवेळी राम मंदिरातील छतातून पाणीगळती सुरू झाली. सकाळी नित्यपुजेसाठी जेव्हा पुजाऱ्यांनी मंदिरात पाऊल ठेवलं तेव्हा जमिनीवर पाणीच पाणी पाहायला मिळालं. अथक प्रयत्नांनंतर हे पाणी काढण्यात आलं. मुख्य म्हणजे या साऱ्यामध्ये मंदिरातून पाणी बाहेर काढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याचंही स्पष्ट झालं. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : किनारपट्टीसह पश्चिम घाटात सरीवर सरी; मुंबईत मात्र काळ्या ढगांचा चकवा, पाऊस गेला तरी कुठं? 


रामलल्लाच्या मूर्तीसमोर जिथं पुजारी बसण्याची जागा आणि व्हीआयपी दर्शनाचं स्थान आहे, तिथंच पावसाचं पाणी छतातून पाझरत असल्यामुळं मंदिरातील अनेक पदाधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. संपूर्ण देशातून निष्णांत अभियांत्रिकी कौशल्य असलेल्यांनी हे मंदिर उभारलं, पण पावसामुळं छतातून पाणीगळती होऊ शकते हे त्यांच्या लक्षात कसं आलं, ही आश्चर्याचीच बाब आहे असं म्हणताना आचार्य सत्येंद्र दास यांनी मंदिर उभारणीमध्ये हलगर्जीपणा केला गेला आहे असाही गंभीर आरोप केला. 


राजकीय आरोप-प्रत्यारोप 


इथं राम मंदिराच्या छतातून पाणी गळती सुरू होताच तिथं राजकीय आरोप- प्रत्यारोपांची सत्र सुरू झाली. मंदिरातील छतातून होणाऱ्या गळतीमुळं काँग्रेसनं भाजप सरकारवर निशाणा साधला. निवडणुकांसाठी अतिघाई करत मंदिराची निर्मिती करण्यात आल्याचं म्हणत काँग्रेसकडून भाजवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आला.  


भारतातील सर्वाधिक खर्च करून उभारण्यात आलेल्या मंदिरांमध्ये राम मंदिराचा समावेश असून, या मंदिराचा निर्मिती खर्च साधारण 1800 कोटींच्या घरात गेल्याचं म्हटलं जातं. जवळपास 70 एकरांच्या भूखंडावर या मंदिराचा विस्तीर्ण परिसर पसरला असून, त्यापैकी 2.7 एकर भूभागावर मंदिराची मुख्य इमारत उभी असून, त्याची उंची 161 फूट इतकी आहे. सध्या मात्र भव्यतेचं दुसरं रुप असणाऱ्या या मंदिराचं प्रत्यक्ष चित्र मात्र अनेकांचीच चिंता वाढवून जात आहे हे नाकारता येत नाही.