)
अयोध्येतील राम मंदिरामधील दानपेटीतील देणगीसंदर्भातील गैरव्यवहार प्रकरणामध्ये नवी माहिती समोर आली आहे. एसआयटीने केलेल्या तपासानंतर या प्रकरणात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. या आठजणांची कसून चौकशी केली जात असून या चौकशीमध्ये बरीच धक्कादायक माहिती आतापर्यंत समोर आली आहे. मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या अविनाश शुक्लाने पोलीस तपासामध्ये आपण देणगी म्हणून भाविकांनी दिलेल्या पैशांचा अपहार केल्याचं मान्य केलं आहे. मी माझ्या प्रेयसीला लाखो रुपयांच्या वस्तू गिफ्ट म्हणून दिल्याचं आरोपीने सांगितलं आहे. पोलीस त्याच्या बँक खात्याची चौकशी करत आहेत. त्याने प्रेयसीला आयफोन भेट दिल्याचेही मान्य केल्याचे वृत्त आहे.
राम मंदिरात नोकरीला लागण्यापूर्वी अविनाश शुक्ला हनुमान गुहेजवळ पिण्याचे पाणी विकायचा. मूळचा प्रतापगडचा रहिवासी असलेल्या अविनाशला नंतर राम मंदिर दान मोजणी केंद्रात नोकरी मिळाली. नोकरीमध्ये रुजू झाल्यानंतर आणि राम मंदिरामध्ये भाविकांची ये-जा वाढल्याच्या तीन ते चार महिन्यामध्ये त्याने पैशांवर डल्ला मारण्यास सुरुवात केली. नोकरी लागल्यानंतर काही महिन्यांमध्ये त्याने पत्नीच्या नावावर प्लॉट घेऊन स्वतःचे घर बांधले. तसेच त्याने कारही विकत घेतल्याने शेजाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या होत्या. अपहार केलेल्या पैशातून विकत घेतलेली त्याची ‘ब्रेझा’ कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
उत्तर प्रदेश पोलीस सध्या अविनाशच्या खात्यातून झालेल्या व्यवहाराची चौकशी करत आहेत. त्याने आपल्या बँक खात्यातून प्रेयसीच्या खात्यात दोन लाख रुपये हस्तांतरित केल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याने प्रेयसीला महागडा आयफोनही भेट दिला होता. अविनाशने स्वत:वर आणि स्वत:च्या घरच्यांबरोबरच मित्रमैत्रिणींवर 19 लाख रुपये उडवल्याचं कबुल केल्याची माहिती समोर आली आहे.
राम जन्मभूमी मंदिरात दानाची रक्कम मोजण्यासाठी कंत्राटी स्वरुपात कामावर असलेल्या अविनाश शुक्लाचे वेतन दरमहा अवघे 15 हजार रुपये इतके होते. तरीही नोकरीला लागल्यापासून त्याने घर, जमीन, कार खरेदी केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. त्याच्याजवळ इतका पैसा कुठून आला, याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती. पोलिसांनी आता त्याची बँक खाती शोधून तपास सुरु केला आहे. अविनाशच्या खात्यावर कुठून, कसे पैसे आले? हे पैसे दानातील रकमेतून चोरले आहेत का? याचाही शोध घेतला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अविनाशचा भाऊ अभिषेकने म्हटले की, अविनाश मंदिरातील ड्युटी संपल्यानंतर पैसे घेऊन योग केंद्रात जाताना दिसायचा. त्याला याबाबत विचारले असता त्याने कधीच समाधानकारक उत्तर दिले नाही, असं त्याचा भाऊ अभिषेकने पोलिसांना सांगितल्याची माहिती आहे. अविनाशने कबूल केले की, चोरीच्या रकमेतून त्याने भावाच्या नावावर ही कार घेतली होती. मंदिरातून चोरी केलेल्या पैशांची आरोपी विभागणी करून घेत होते, हेदेखील त्याने मान्य केले.
दुसरा आरोपी अनुकल्प मिश्राने तर एवढे पैसे भाविकांनी स्वच्छेने दिलेल्या रक्कमेतून उभे केल्याचा अजब दावा केला आहे. मंदिरात भाविकांचे दर्शन झाल्यावर ते स्वखुशीने पैसे भेट म्हणून देतात, असं अनुकल्प मिश्रा म्हणाला.