नवी दिल्ली : रामदेव बाबांच्या पतंजली या ब्रँडने आता कपड्यांच्या बाजारपेठेत शिरकाव केलाय. दिल्लीत पतंजलीच्या तयार कपड्यांच्या दुकानाचं उदघाटन करण्यात आलं. लीव्ह फीट, आस्था आणि संस्कार या तीन नावांनी हे ब्रँड बाजारात आणले आहेत. जवळपास ३००० तयार कपड्यांची उत्पादनं बाजारपेठेत आणली आहेत. पतंजली परिधान असं या दुकानाचं नाव आहे. याची जवळपास १०० आऊटलेट्स भारतभरात उघडली जाणार आहेत. पतंजली परिधानची देसी जीन्स अधिक चर्चेत आहे. आपण स्वतः बाबा आहोत म्हणून आधुनिकतेचं वावडं आपल्याला असेस असं समजवण्याचं कारण नाही असं रामदेव बाबा यांनी नमूद केलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खास दिवाळीनिमित्त पतंजलीच्या या दुकानात २५ टक्क्यांपर्यंतची सूट देण्यात येणार आहे. पतंजली जिन्सची किंमत ५०० रुपये ठेवण्यात आली आहे. या दुकानाच्या उद्घाटनाला रामदेव बाबांच्यासोबत ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर उपस्थित होते.


पतंजली परिधान या दुकानामध्ये भारतीय आणि पाश्चिमात्य कपडेही विकले जाणार आहेत. तसंच महिला आणि पुरुषांचे कपडेही या दुकानात मिळणार आहेत. या दुकानात कपड्यांसोबतच बूट आणि बेल्टही मिळणार आहेत.


महिलांशी संबंधित असलेल्या उत्पादनांना आस्था हे नाव देण्यात आलंय. तर पुरुष आणि मुलांच्या कपड्यांना संस्कार नाव असेल. संस्कार परिधान करा... संस्कारी दिसा... आस्था ठेवून आपल्या राष्ट्राला देशाला मजबूत करा... असं रामदेव बाबा या कार्यक्रमादरम्यान म्हणाले.