)
SBI Bank News : नवनवीन तंत्रज्ञान आणि नवनवीन व्यवहार या आणि अशा अनेक मुद्द्यांना अनुसरून बँकांच्या कार्यपद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल करत खातेधारकांना बँकेच्या सुविधा अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्याकडे अनेक बँकांचा कल असतो. सार्वजनिक क्षेत्रात येणारी SBI ही बँकसुद्धा इथं अपवाद नाही. याच धर्तीवर एसबीआयनं आता एक महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नोव्हेंबरच्या पहिल्याच दिवशी अर्थात 1 नोव्हेंबरला हा महत्त्वाचा नियम खातेधारकांसाठी लागू होणार असून पैशांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार बदलणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एसबीआय कार्ड (SBI Card) कडून आता नव्यानं फी स्ट्रक्चर आणि इतर शुल्कांमध्ये बदल करण्याची घोषणा करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2025 पासून हे बदल लागू होणार असून, यामध्ये शिक्षणाशी संबंधित व्यवहार आणि 'वॉलेट लेंडिंग'वरील शुल्कसुद्धा वाढवण्यात आलं आहे. एसबीआय कार्डकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे बदल थर्ड पार्टी अॅप ट्रान्झॅक्शन आणि 1000 रुपयांहून अधिक वॉलेट टॉपअपवर लागू होणार आहेत. रोकड सेवा, पेमेंट डिसऑनर आणि उशिरा होणार पेमेंटवर मात्र कोणतंही नवं शुल्क लागू करण्यात येणार नाही असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.
1 नोव्हेंबर 2025 पासून शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थेला थर्ड पार्टी अॅप किंवा अॅग्रीगेटरच्या माध्यमातून शैक्षणिक रक्कम दिल्यास त्यावर 1 टक्के Transaction Fee आकारली जाणार आहे. ही रक्कम संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कॅम्पसवर पीओएस (POS) टर्मिनलच्या माध्यमातून थेट रकमेवर लागू होणार नाही.
एसबीआय कार्डच्या (SBI Card) माहितीनुसार 1 नोव्हेंबरपासून थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून शैक्षणिक व्यवहारांवर वाढीव रक्कम लागू होणार आहे. असं असलं तरीही महाविद्यालय किंवा शाळेच्या अधिकृत संकेतस्थळावर पीओएस यंत्राच्या सहाय्यानं थेट पैसे भरल्यास त्यावर मात्र कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. पेटीएम किंवा फोन पेनं फी ची रक्कम भरणाऱ्या वापरकर्त्यांवर या बदलांचा थेट परिणाम होणार आहे.
1 नोव्हेंबरपासून 1000 रुपयांहून अधिकच्या वॉलेट लोड ट्रांझॅक्शनवर 1% शुल्क आकारण्यात येईल, तर 2000 हून अधिकच्या वॉलेट रिचार्जवर 20 टक्के वाढीव शुल्क असेल. हे शुल्क डिजिटल वॉलेट, अॅमेझॉन पे, फोन पे किंवा पेटीएममध्ये क्रेडिट कार्डनं पैसे भरण्यावर लागू होईल.
बँकेच्या या नव्या नियम बदलांचा थेट परिणाम हा डिजिटल ट्रान्झॅक्शनवर होणार असून, अॅप आणि वॉलेटवर अवलंबून असणाऱ्या युवा खातेधारकांना याचा फटका बसणार आहे. जाणकारांच्या मते या माध्यमातून वापरकर्त्यांना स्मार्ट पेमेंट निवडण्याची मुभा असेल. त्यामुळं आता नेमका हा परिणाम कोणत्या स्वरुपात दिसेल हे पाहणं महत्त्वाचं असेल.
लेट पेमेंट चार्ज (किमान रक्कम न फेडल्यास...) :0 – 500 रुपये: शून्य.
> 500 – 1,000 रुपये: 400 रुपये.
> 1000 – 10,000 रुपये: 750 रुपये.
> 10,000 – 25,000 रुपये: 950 रुपये.
> 25,000 – 50,000 रुपये: 1,100 रुपये.
> 50,000 रुपये: 1,300 रुपये.