क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्वाची बातमी

...

Updated: Jun 16, 2018, 04:07 PM IST
क्रेडिट कार्ड युजर्ससाठी महत्वाची बातमी  title=
Representative Image

मुंबई : तुमच्याकडे बँकेचं क्रेडिट कार्ड आहे? तर मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही एखाद्या बँकेचं क्रेडिट कार्ड घेतलं आहे आणि त्याची थकबाकी तुमच्या नावावर आहे? तर मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. होय, भलेही तुम्ही व्हॉट्सअॅप मेसेजला गंभीरतेने घेत नसाल पण मुंबई उच्च न्यायालयाने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पाठवण्यात आलेल्या नोटीसला वैध ठरवलं आहे.

मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी दरम्यान क्रेडिट कार्डची थकबाकी असलेल्या ग्राहकाने पीडीएफ फाईलमध्ये आलेली नोटीसही वाचून दाखवली. 

टाईम्स ऑफ इंडियात आलेल्या वृत्तानुसार, नालासोपारा येथील निवासी रोहिदास जाधव यांनी २०१० रोजी क्रेडिट कार्डचे ८५ हजार रुपये थकवले होते. सुनावणी दरम्यान २०११ मध्ये उच्च न्यायालयाने रोहिदासला ८ टक्के व्याजासह पेमेंट करायला सांगितलं. मात्र, जाधव यांनी पेमेंट केलं नाही. त्यानंतर उच्च न्यायालयात एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेसकडून २०१५ मध्ये १.१७ लाख रुपये थकवल्याचा खटला दाखल करण्यात आला.

याच दरम्यान जाधव यांनी आपलं घर शिफ्ट केलं आणि एसबीआय कार्ड्स त्याला कायदेशीर नोटीस पाठवू शकले नाही. पण कंपनीकडे जाधव यांचा मोबाईल नंबर होता. त्यामुळे बँकेच्या प्रतिनिधीने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जाधव यांना खटल्याची पुढील तारीख कळवली.

कंपनीने पाठवलेली नोटीस मिळाली नसल्याचा प्रतिवादी रोहिदास जाधव यांनी केला होता. यानंतर वकील मुरलीधर काळे यांनी न्यायालयात सांगितले की, जाधव यांच्या मोबाईल क्रमांकावर नोटीस सेंड झाली आणि त्यांनी ती वाचली सुद्धा. ब्ल्यू टीक वरुन स्पष्ट होतं की त्यांनी नोटीस वाचली. जाधव यांनी घर बदललं असल्याने त्यांना थेट नोटीस पाठवणं शक्य झालं नाही. त्यामुळे जाधव यांना व्हॉट्सअॅपच्या माध्यामातून नोटीस पाठवण्यात आली.

जाधव यांना व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून पीडीएफ नोटीस पाठवल्याच्या पुराव्यादाखल कंपनीतर्फे मोबाईल स्क्रीन शॉट्‌स सादर केले. यानंतर न्यायालयाने कंपनीला पुढील सुनावणीच्या वेळी प्रतिवादीचा निवासी पत्ता देण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यकता वाटल्यास नव्या पत्त्यावर जाधव यांच्याविरोधात वॉरंट जारी केले जाईल असंही न्यायालयाने सांगितले.