Bharat Ratna : भारतरत्न हा पुरस्कार एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल देण्यात येतो. हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यामध्ये राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत तसेच शास्त्रज्ञ, लेखक, उद्योगपती आणि समाजसेवक यांना देण्यात येतो.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्या, यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला आहे. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला संमती दिली आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. महात्मा ही उपाधी मोठी आहे की भारतरत्न पुरस्कार? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या
छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर महात्मा की भारतरत्न यावरून चर्चा सुरू झाली आहे. महात्मा ही उपाधी जनतेनं दिली असून भारतरत्न अनेक आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता थेट विधानसभेतच 'महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, असा ठराव मांडण्यात आला आहे. जयकुमार रावल यांनी विधानसभेत हा ठराव मांडला आहे. विधानसभेचा हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचंही जयकुमार रावल यांनी सांगितलं.
छगन भुजबळ यांनी सरकारच्या या ठरावाचं स्वागत केलं आहे. मात्र, महात्मा ही उपाधी मोठी की भारतरत्न हा पुरस्कार मोठा, असा सवाल पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महात्मा ही उपाधी सर्वसामान्य जनतेनं बहाल केल्याचं देखील यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारच्या ठरावाचं स्वागत केलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जुनी मागणी आहे. ती आता पूर्ण होत असल्यास सभागृहाची एकमतानं मंजुरी असेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी जुनीच आहे. मात्र आता छगन भुजबळ यांनी भारतरत्न की महात्मा असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार भारतरत्नच्या ठरावावर काय निर्णय घेतं, याकडे आता लक्ष लागलं आहे.