)
Big Deal Rs 21 Crore Discount: 'फायनल कितीला देणार?', 'देने का भाव बोलो', 'अमूक-तमुकला डन करु' ही अशी वाक्यं आपणही अनेकदा दुकानामध्ये एखादी गोष्ट खरेदी करताना वस्तूंचा भाव निश्चित करताना वापरतो. आपल्यातले काही जण अगदी उत्तम पद्धतीने बार्गेनिंग करतात तर काहींना एक रुपयाही कमी करुन घेता येत नाही. शॉपिंग करताना बार्गेनिंग करणं ही एक कला आहे, असंही म्हणतात. त्यामुळेच सर्वांनाच वस्तूंचा भाव करता येत नाही हे ही खरं आहे. मात्र गुजरातमध्ये काही दिवसांपूर्वीच देशातील सर्वात मोठी बार्गेनिंग झाली आणि ज्यामध्ये तब्बल 21 कोटी रुपयांची सवलत खरेदीदारांना मिळाली. हा व्यवहार केवळ भारतात नाही तर जगभरात चर्चेत आहे.
हा व्यवहार गुजरातमध्ये शनिवारी पार पडला. गुजरातमध्ये जैन समुदायाने तब्बल 186 महागड्या लक्झरी कार एकत्रित खरेदी केल्या. जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (जेआयटीओ) पुढाकारातून झालेल्या या खरेदीत बीएमडब्ल्यू, ऑडी आणि मर्सिडिजसारख्या लक्झरी ब्रँडच्या कारचा समावेश आहे. जेआयटीओ ही एक सेवाभावी संघटना असून त्यांचे देशभर 65 हजार सदस्य आहेत. संघटनेचे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी शनिवारी या अनोख्या खरेदीची माहिती दिली.
हिमांशू शाह यांनी या व्यवहाराची माहिती देताना, 'या 186 लक्झरी कारमध्ये प्रत्येक कारची किंमत 60 लाखांपासून 1.3 कोटी रुपयांपर्यंत आहे. यावर्षी जानेवारी ते जून या काळात संपूर्ण भारतात या कार संबंधित मालकांकडे सोपविण्यात आल्या. जेआयटीओच्या या राष्ट्रव्यापी अभियानाच्या माध्यमातून सदस्यांची 21 कोटी रुपयांची बचत झाली,' असं सांगितलं. म्हणजेच एकत्र 186 लक्झरी कार्स विकत घेतल्याने जैन सामाजातील या व्यवपाऱ्यांना कंपन्यांशी किंमतवरुन बार्गेनिंग करता आली. दराच्या या घासाघीशीमध्ये जैन समाजातील सदस्य असलेल्या या संघटनेतील व्यापाऱ्यांना तब्बल 21 कोटी रुपयांचा फायदा झाला.
या 186 कार खरेदीत मिळालेले डिस्काऊंट पाहता एकूण 21 कोटी रुपयांची बचत झाली. म्हणजचे प्रत्येक सदस्याने सुमारे 8 ते 17 लाख रुपये वाचवले. जैन यांच्यानुसार, या लाभामुळे उत्साहित 'जेआयटीओ'ने आता 'उत्सव' हा नवा उपक्रम सुरू केला. यात दागिने, नामांकित ब्रँडच्या वस्तू खरेदीसाठीही ही व्यवस्था लागू करण्यात आली आहे. म्हणजेच भविष्यात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात बल्क ऑर्डर देऊन घसघशीत सवलत मिळवल्याचा जैन व्यापाऱ्यांचा प्रयत्न असणार आहे.