मुंबई : देशात दुष्काळ पडण्याची शक्यता स्कायमेटने या खासगी हवामान संस्थेने व्यक्त केली आहे. ऑगस्टप्रमाणेच सप्टेंबरमध्येही पाऊस पाठ फिरवण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. सप्टेंबरमध्ये 20 टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता असून पाऊस सामान्य राहण्याची 60 टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सामान्य पेक्षा जास्त पावसाची शक्यता 20 टक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदा नैऋत्य मान्सूनला लवकर सुरुवात झाली, जून महिन्याच्या अखेरीस सरासरीच्या (110 टक्के) चांगला पाऊस झाला. जुलै महिन्यात 11 जुलैपर्यंत पावसाचा जोर काहीसा कमी होता. जुलै महिन्यात सरासरीच्या 93 टक्के इतका पाऊस पडला. स्कायमेटने जूनमध्ये 106 तर जुलैमध्ये 97 टक्के पावसाची शक्यता वर्तवली होती. 


जुलै महिन्यात मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात यात आणखी घट झाली. कमी पावसामुळे ऑगस्टच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात हंगामी पावसाची तूट 9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत यात फारशी सुधारणा झालेली नाही.


मान्सूनचा भौगोलिक परिणाम पाहिला तर गुजरात, राजस्थान, ओडिशा, केरळ आणि ईशान्य भारतात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये अजूनही दुष्काळाची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील पर्जन्यमान असलेल्या भागात पाऊस बऱ्यापैकी झाला आहे.