मुस्लिमबहुल असल्यामुळेच मोदी सरकारने काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला- चिदंबरम
लष्कराने संचारबंदी उठवल्यानंतर काश्मीरमधील वातावरण शांत आहे.
चेन्नई: काश्मीर हा केवळ मुस्लिमबहुल आहे म्हणूनच मोदी सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केला, असा गंभीर आरोप माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केला. ते रविवारी चेन्नई येथे बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंदूंची लोकसंख्या जास्त असती तर भाजपने अनुच्छेद ३७० कधीच रद्द केला नसता. मात्र, प्रत्यक्षात काश्मीरमध्ये मुस्लीम जनसंख्या जास्त असल्यामुळे सरकारने अनुच्छेद ३७० रद्द केले, असा आरोप चिदंबरम यांनी केला.
गेल्या आठवड्यात संसदेत काश्मीरमधील अनुच्छेद ३७० आणि कलम ३५अ रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. तेव्हापासून काश्मीरमध्ये मोठ्याप्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले आहे. नुकतीच लष्कराने काश्मीरमधील संचारबंदी उठवली होती. यानंतर काश्मीर खोऱ्यात तुरळक अपवाद वगळता शांततेचे वातावरण आहे.
मात्र, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांकडून काश्मीरमधील खरी परिस्थिती वेगळीच असल्याचे सांगितले जात आहे. याचाच हवाला देऊन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सरकारवर टीका केली आहे. काश्मीरमध्ये काय घडत आहे, हे एकदा पाहा. सरकारने स्वत:हून आपले हात आगीत घातले आहेत. काश्मीर वाचवणे ही प्राथमिकता आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदी, अमित शहा आणि अजित डोवाल यांना आवाहन करतो की, त्यांनी सावध राहावे. अन्यथा काश्मीर गमवावा लागेल, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले.