'आता सहन होत नाही...', निवडणूक अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या VIDEO तून गौप्यस्फोट, 'मागच्या 20 दिवसांपासून...'

सर्वेश कुमार यांन आपण मतदार यादीच्या मतदार फेरआढावा मोहिमेचे (Special Intensive Revision) काम पूर्ण करण्यात अयशस्वी झालो असल्याचं सांगितलं.   

शिवराज यादव | Updated: Dec 1, 2025, 05:36 PM IST
'मला जगायचंय, पण हे लोक...', निवडणूक अधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या VIDEO तून गौप्यस्फोट, 'आता हे सहन होत नाही...'

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करणाऱ्या 46 वर्षीय शिक्षकाचा राहत्या घरी मृतदेह सापडला होता. यानंतर आता दुसऱ्याच दिवशी कुटुंबाला त्यांचा एक व्हिडीओ सापडला आहे. हा व्हिडीओत त्यांनी आपण नेमकं टोकाचं पाऊल का उचललं हे उघड केलं आहे. व्हिडिओमध्ये, सर्वेश कुमार म्हणाले की, ते मतदार फेरआढावा मोहिमेचे (Special Intensive Revision) काम पूर्ण करण्यात अयशस्वी झाले आहेत, तसंच या जगापासून दूर जात असल्याबद्दल कुटुंबाची माफी मागितली आहे. त्यांनी त्यांच्या आई आणि बहिणीला त्यांच्या चार मुलींची काळजी घेण्यास सांगितलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

सरकारी शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या सर्वेश कुमार यांना 7 ऑक्टोबर रोजी बीएलओचं काम सोपवण्यात आलं. त्यांना पहिल्यांदाच बीएलओचं काम सोपवण्यात आलं  होतं, जे घरोघरी जाऊन मतदारांची माहिती आणि कागदपत्रे गोळा करतात. रविवारी पहाटे, सर्वेश यांची पत्नी बबली यांना घऱात ते मृतावस्थेत आढळले. बीएलओ ड्युटीमुळे ते कामाचा तणाव असह्य होत असून, त्याचा सामना करु शकत नाहीत असं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे.

"दीदी, मला माफ कर. मम्मी माझ्या मुलांची काळजी घे. मी निवडणुकीच्या कामात अपयशी ठरलो आहे. मी आता पाऊल उचलत असून, त्यासाठी मीच जबाबदार आहे. कोणाचीही काही चूक नाही. मी नाराज आहे. मी मागील 20 दिवसांपासून नीट झोपू शकलेलो नाही. जर माझ्याकडे वेळ असता, तर मी ते काम पूर्ण केलं असतं. मला चार लहान मुली आहेत. मला माफ करा. मी तुमच्या जगापासून दूर चाललो आहे," असं सर्वेश कुमार यांनी व्हिडीओत  सांगितलं आहे. यावेळी त्यांना अश्रू अनावर होत होते. आपल्याला जगायचं आहे, पण खूप ताण आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 

मतदार यादीतील तफावत दूर करण्यासाठी निवडणूक आयोग अनेक राज्यांमध्ये एसआयआर करत असताना बीएलओंच्या कामाच्या परिस्थितीबद्दल देशभरात वाद सुरु आहे. यादरम्यानच कुमार यांचा मृत्यू झाला आहे. एसआयआरमध्ये काम सुरू केल्यानंतर अनेक बीएलओंचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्या कुटुंबियांनी कामाच्या ताणाला जबाबदार धरलं आहे. काही बीएलओंनी अधोरेखित केले की त्यांना दररोज 14-15 तास काम करावे लागते आणि वेतन खूपच कमी आहे. यात भर म्हणजे जर ते वेळेत काम पूर्ण करू शकले नाहीत तर शिस्तभंगाची कारवाई होण्याची भीती होती.

सर्वेश कुमार हे दलित समाजातील होते. त्यांचं कुटुंब मुरादाबादच्या भोजपूरमधील बहेडी गावात वास्तव्यास आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांच्या कुटुंबातील सदस्य करत आहेत.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More