)
DMart Shopping Business : इतर किराणा दुकानांच्या तुलनेत डी मार्ट हे एक असं सर्वसमावेशक ठिकाण आहे जिथं वाणसामानापासून ते अगदी जीवनावश्यक गोष्टींपर्यंतच्या गोष्टी सवलतीच्या दरानं मिळतात. घरात वापरायची भांडी, पडदे, चादरी, प्लास्टीकच्या गोष्टीसुद्धा इथं कायच्याकाय कमी दरात मिळतात. त्यामुळं डीमार्टमध्ये एकदा पाऊल ठेवलं की इथून बाहेर पडताना तास, दोन तास, तीन तास... वेळ कधी निघून जातो हेच लक्षात येत नाही.
लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे डीमार्टमध्ये वस्तू स्वस्त दरात मिळत असल्या तरीही त्यांचा खप वाढवण्यासाठी काही व्यावसायिक तंत्रसुद्धा अवलंबली जातात. यामध्ये ग्राहकांना आकर्षित करत त्यांच्या आवडीच्या गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध करून देणं आणि तेसुद्धा किमान दरात हे DMart ला अगदी उत्तमरित्या जमलं आहे. यापैकीच एक तंत्र म्हणजे डीमार्टमध्ये जीवनावश्यक गोष्टींसमवेत बाहेर मिळणारे खमंग पॉपकॉर्न आणि गारेगार आईस्क्रीम.
गृहिणी किंवा घरासाठी उपयुक्त साहित्य खरेदी करण्यासाठी प्रौढांचा कल असतो तिथंच डिमार्टमध्ये मोठ्यांसमवेत येणाऱ्या बच्चेकंपनीचा कल हा तिथं असणारी खेळणी आणि त्याहूनही या शॉपिंग सेंटरच्या बाहेर विक्री केल्या जाणाऱ्या पॉपकॉर्न आणि आईस्क्रीमकडे असतो. लहान मुलांचं इथे येण्याचं वाढतं प्रमाण, लक्षात घेता डीमार्टनं ही बाब अचूकपणे हेरत बच्चे कंपनीचं लक्ष वेधलं जाईल आणि उत्तम खप होईल असं पॉपकॉर्न, आईस्क्रीम आणि तत्सम स्नॅक्स अर्थात किफायतशीर दरात सुका खाऊ प्रत्येक शाखेबाहेर विकण्यास सुरुवात केली.
डीमार्टमध्ये आईस्क्रीम 20 ते 30 रुपयांदरम्यान आणि पॉपकॉर्न 10 ते 30 रुपयांमध्ये मिळतं. ही किंमत तिथं होणाऱ्या खरेदीच्या तुलनेच अतिशय नगण्य असल्या कारणानं बाहेर बालहट्ट पुरवणारे बरेच पालक दिसतात. इतकंच कार, तर मोठी मंडळीसुद्धा या पदार्थांचा आनंद घेतात. या साऱ्याचा थेट परिणाम या वस्तूंचा होणारा खप आणि त्यांना असणाऱ्या मागणीमध्ये होतो आणि DMart च्या एकूण उत्पन्नावर याचा थेट आणि सकारात्मक परिणाम दिसून येतो. या वस्तू डिमार्टच्याच अख्त्यारित विकल्या जातात. ज्यामुळं ती विकणारी माणसं वेगळी असली तरीही चवीमध्ये प्रचंड सातत्य दिसून येतं.
DMart ची विक्री वाढवण्याची मुख्य रणनीती काय?
DMart ग्राहकांना कमी किंमतीत विविध वस्तू (किराणा, घरगुती साहित्य, कपडे) उपलब्ध करून देतो आणि त्याचवेळी कुटुंबांना आकर्षित करण्यासाठी शॉपिंग अनुभव मजेदार बनवतो. यात स्टोअर बाहेर स्नॅक्स विक्रीचा समावेश असतो, ज्यामुळे ग्राहकांची वेळ वाढते आणि एकूण खरेदी वाढते.
DMart स्टोअर बाहेर पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम विक्री का केली जाते?
ही रणनीती लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी आहे. कुटुंबासोबत शॉपिंग करताना मुले खेळण्यांप्रमाणेच स्नॅक्सकडे आकर्षित होतात, ज्यामुळे पालकांना मुले शांत ठेवण्यासाठी हे विकत घेणे सोईचे वाटते.
या स्नॅक्स विक्रीचा DMart च्या उत्पन्नावर काय परिणाम होतो?
ही विक्री DMart च्या एकूण उत्पन्नात सकारात्मक योगदान देते. उदाहरणार्थ, FY-22 मध्ये Avenue Food Plaza (DMart ची सहाय्यक कंपनी) ने या विक्रीतून 43 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आणि 53 लाखांचा नफा झाला.