Business news success story : साचेबद्ध नोकरीनं पिचलेली अनेक मंडळी आजुबाजूला दिसतात, ज्यांनी एकतरी क्रांतीकारी स्वप्न पाहिलेलं असतं. काहीजण या स्वप्नपूर्तीच्या दिशेनं झेपही झेतात. अशीच झेप एका तरुणानं घेतली, आणि कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला.

Business news success story : स्वप्न पाहायची असतात, ती साकारण्यासाठी मेहनतसुद्धा घ्यायची असते. कारण, कधी ना कधी या प्रयत्नांना यश मिळतंच. असंच स्वप्न प्रत्यक्षात उतरवत त्याला यशाची किनार देणाऱ्या एका तरणाची भारतीय व्यवसाय क्षेत्रात बरीच चर्चा होते. या पठ्ठ्यानं व्यवसायाचं स्वप्न पाहिलं, पण ते इतक्या कमी वयात पाहिलं, की अनेकांनाच त्याची कमाल वाटली.
शिक्षण, नोकरी आणि मग नोकरीत मन रमेनासं झाल्यावर व्यवसायाचं स्वप्न अशा क्रमात न अडकता या तरुणानं महाविद्यालयीन शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि वयाच्या 19 व्या वर्षी एका भन्नाट व्यवसायाची सुरुवात केली, आज त्याच व्यवसायाची उलाढाल कोट्यवधींवर असून, या तरुणानं अनेकांना स्वप्न पाहून ती यशस्वीरित्या सत्यात उतरवण्याची प्रेरणा दिली. मूळच्या ओडिशा येथील बिसम कटकचा रहिवासी असणाऱ्या या तरुणाचं नाव आहे रितेश अग्रवाल.
वयाच्या 17 व्या वर्षी रितेशनं महाविद्यालयीन शिक्षण सोडलं. तंत्रज्ञानामध्ये त्याचं मन रमत होतं, ज्यामध्येच त्याला व्यवसाय करायचा होता. अखेर वयाच्या 19 व्या वर्षी त्यानं व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली आणि तेव्हापासून त्यानं आतापर्यंत कोट्यवधींचं साम्राज्य उभं केलं. 2013 हे तेच वर्ष जेव्हा रितेशनं ओरावेल स्टेज लाँच केलं. हे एक असं प्लॅटफॉर्म होतं, जिथं प्रवाशांना भारतात किफायतशीर दरात घरापासून दूर, प्रवासालं, भटकंतीसाठी गेलं असता मुक्कामाची व्यवस्था करून मिळेल.
रितेश इथंच थांबला नाही. त्यानं या स्टार्टअपला एक नवं रूप दिलं. 2015 मध्ये त्याच्या ब्रँडची ओळख झाली OYO रुम्स. किफायतशीर राहण्याची व्यवस्ता, ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यावर त्याच्या कंपनीनं लक्ष केंद्रीत केलं. आज संपूर्ण भारतभर ओयो रुम्सअंतर्गत अनेक लहानमोठ्या हॉटेलांमध्ये राहण्याची सोय आहे. अगदी निसर्गरम्य ठिकाणांवरसुद्धा. रितेशनं परदेशातही आपल्या व्यवसायाच्या कक्षा रुंदावल्या. ज्यामध्ये दक्षिण आशियाई देश, युरोप आणि अमेरिकेचा समावेश आहे.

वयाच्या 17 व्या वर्षी शिक्षण सोडणाऱ्या रितेशनं व्यवसाय क्षेत्रामध्ये स्वत:ला झोकून दिलं. संघर्ष त्यालाही चुकला नाही. मात्र, इथंही आव्हानांना तोंड देत तो भक्कमपणे उभा राहिला. विविध अहवालांनुसार रितेशनं उभ्या केलेल्या ओयो रुम्सच्या व्यवसायाची किंमत साधारण 14000 से 18000 कोटींच्या घरात पोहोचली आहे. रितेश यशस्वी झाला, पण इथंच थांबला नाही. सातत्यानं तो नवनवीन संकल्पनांवर काम करत असून, या व्यवसायाला आणखी उंचीवर नेण्याचाच प्रयत्न करत आहे आणि नकळत आपल्या कामातून अनेक युवांना प्रेरणाही देत आहे.