कर्नाटकात एका तरुणावर आपल्या वडिलांची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हत्या केल्यानंतर त्याने इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्यू झाल्याचा भास निर्माण करत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 11 मे रोजी ही हत्या करण्यात आली. पोलिसांवर या प्रकरणात तपास करण्यासाठी आणि घटनास्थळाचं सीसीटीव्ही तपासण्यासाठी दबाव टाकण्यात आल्यानंतर घटना उघडकीस आली. कर्नाटकातील तुमकुरु जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
नागेश आणि त्यांचा मुलगा सूर्या 11 मेच्या रात्री अपोलो आईस्क्रीम फॅक्टरीत होतो. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे त्यानुसार, मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांच्या सुमारास दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर याचं रुपांतर मारहाणीत झालं.
व्हिडीओनुसार, 55 वर्षीय नागेश यांनी आधी सूर्याच्या कानाखाली लगावली. यानंतर त्यांनी चप्पल काढली आणि सूर्याला त्याच्याने मारहाण केली. यादरम्यान सूर्याने वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला. हे सर्व घडत असताना सूर्याच्या हातात पांढऱ्या रंगाचा कपडा दिसत आहे, जो त्याने सोडला नाही.
पाठ वळताच सूर्याने आपल्या हातातील कपडा वडिलांच्या गळ्याभोवती आवळला. त्याने वडिलांनी खाली जमिनीवर पाडलं आणि गळा दाबण्यास सुरुवात केली. यादरम्यान आणखी एक तरुण सूर्याच्या मदतीला आला. तो त्याचा मित्र असावा असा अंदाज आहे. यानंतर त्याने वडिलांचा मृत्यू झाला आहे की नाही याची खातरजमा करुन घेतली.
दिशाभूल करण्यासाठी सूर्या आणि त्याच्या मित्राने मृतदेह एका बेडमध्ये गुंडाळला आणि बोटांना इलेक्ट्रिक शॉक दिला. पोलिसांनी सांगितलं आहे की, त्यांना मृत्यू वीजेचा झटका झाल्याने दाखवायचं होतं.
विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याने पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्याची शक्यता होती. पण नागेश यांची बहिण सविता यांना काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय आला. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तपास करण्याचं आवाहन केलं.
पोलिसांनी तपासादरम्यान, फॅक्टरीमधील सीसीटीव्ही तपासलं. यानंतर त्यांना नागेश यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा उलगडा झाला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सूर्याला वडिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केली. त्याच्या मित्राची ओळख अद्याप पटलेली नाही. दरम्यान पोलीस हत्येच्या कारणाचा शोध घेत आहेत.