Corona News : पुन्हा घ्यावा लागणार बूस्टर डोस? भारतासह 'या' 5 आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांमुळे वाढली चिंता

Corona News : पाच वर्षांपूर्वी ज्या कोरोनानं जगाची चिंता वाढवली होती, तोच कोरोना आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून भारतातही चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.   

सायली पाटील | Updated: May 22, 2025, 01:33 PM IST
Corona News : पुन्हा घ्यावा लागणार बूस्टर डोस? भारतासह 'या' 5 आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांमुळे वाढली चिंता
Corona Booster shots needed again COVID 19 cases surge in 5 Asian countries including China health news

Corona News : संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या आणि अनेकांचेच बळी घेणाऱ्या कोरोना विषाणूचा संसर्ग पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच सिंगापूर, चीन, थायलंड, हाँगकाँग या आशियाई देशांसह भारतातसुद्धा कोरोना रुग्ण आढळले आणि आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली. दरम्यान, नागरिकांमध्ये या संसर्गामुळं पुन्हा भीतीचं वातावरण असतानाच डॉक्टरांनी तूर्तास या परिस्थितीमध्ये घाबरून न जाता सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 

बूस्टर डोस घ्यावा लागणार? 

जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असल्यामुळं आता पुन्हा एकदा कोरोनाची लस, बूस्टर शॉट घ्यावा लागणार का? हाच प्रश्न सातत्यानं उपस्थित होत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना सध्याच्या घडीला कोरोनाच्या धर्तीवर बूस्टर डोस घ्यायचा सल्ला दिला जात आहे. यामध्ये वृद्ध, लहान मुलं, मधुमेह असणारे रुग्ण, कॅन्सर आणि तत्सम गंभीर आजार किंवा शारीरिक व्याधी असणारे रुग्ण यांना कोरोनाची बूस्टर लस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. हाँगकाँग आणि सिंहापूरमध्येही नागरिकांना बूस्टर डोस घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, अखेरची लस घेऊन 6 महिने उलटले असतील त्यांनाही ही लस घेण्याचा सल्ला तिथं दिला जात आहे. 

भारतात कशी काळजी घ्यावी? 

आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार भारतातील कोणी नागरिक वरील देशांमध्ये प्रवास करणार असतील तर, कोरोनाच्या धर्तीवर त्यांनाही लसीचा बूस्टर डोस घेण्याचा सल्ला दिला जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार XBB.1.5 मोनोवैलेंट बूस्टर वॅक्सिन कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटविरोधात 19 ते 49 टक्क्यांपर्यंत बचाव करण्यास मदत करते. मात्र याआधी कोरोनाच्या दोन लसी घेतल्यासही या संसर्गाचा प्रतिकार करण्यास मदत होते असं तज्ज्ञांचं मत. 

सावधगिरी बाळगण्यासाठी काही उपाय... 

  • गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा आणि जाणं होणार असेल तर मास्कचा वापर करा. 
  • नियमित स्वरुपात सॅनिटायजर वापरा. 
  • खोकताना किंवा शिंकताना तोंडावर, नाकावर रुमाल धरा. 
  • सिंगापूर, हाँगकाँग, चीन, थायलंड या देशांमध्ये प्रवास करणार असाल तर सावधगिरी बाळगा. गरज नसल्यास प्रवास टाळा. 
  • ताप, सर्दी- खोकला, घशात खवखव अशी लक्षणं दिसल्यास गृहविलगीकरणात राहून काळजी घ्या.