खरगोन : कापसाचा भाव वाढत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या, मात्र यात काही अफवाही होत्या, मात्र मध्य प्रदेशातील कापसाची बाजारपेठ असलेल्या खरगोन, सेंधवा येथे कापसाच्या दराने उच्चांक गाठला आहे. नवीन वर्षी १ जानेवारी २०२२ रोजी येथे कापसाला प्रति क्विंटल १० हजाराच्या वर दर देण्यात आला. कापसाच्या भावाच्या बाबतीत हा उच्चांक मानला जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र तरीही महाराष्ट्रात स्थानिक ठिकाणी काही व्यापारी अजूनही शेतकऱ्यांची गळचेपी करत आहेत, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपयांच्या वर भाव देत नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चांगल्या प्रतिच्या कापसाला १० हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मध्य प्रदेशात दिला जात आहे.



पावसाळ्याच्या सुरुवातीला जोरदार पावसाने कापूस पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, पाऊस लांबल्याने अनेक ठिकाणी पिक खराब झालं, तर काही ठिकाणी वाहून गेलं. यामुळे कापूस उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. कापसाचा पेरा दरवर्षाप्रमाणे जास्त असला, तरी त्या प्रमाणात कापसाचं उत्पन्न आलेलं नाही.


एकीकडे कापसाला खूप चांगला भाव आहे, असं म्हटलं जात असलं, तरी शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाचं प्रमाण कमी आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस पडून असला, तरी त्याचं प्रमाण इतर वर्षाप्रमाणे नसल्याचं दिसून आलं आहे.


जागतिक बाजारपेठेत कोरोनानंतर पुन्हा कापसाला मागणी वाढली आहे, तेवढ्या प्रमाणात कापूस उपलब्ध नाही, यामुळे कापसाचे दर वाढले आहेत. सतत कापसाची मागणी वाढत असल्याने कापसाचे भाव वाढत आहेत, यावेळी कापसाचा भाव ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, दर वर्षी तो ५ ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत जात होता.