लग्नाच्या 36 व्या दिवशी जेवणात विष घालून 22 वर्षीय तरुणीने पतीला संपवलं; सासूनेच सांगितला घटनाक्रम

Crime News: लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ती माहेरी निघून गेली. मात्र त्यानंतर परतल्यावर तिने डाव साधला आणि स्वत:च्या नवऱ्याला संपवलं

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2025, 06:45 AM IST
लग्नाच्या 36 व्या दिवशी जेवणात विष घालून 22 वर्षीय तरुणीने पतीला संपवलं; सासूनेच सांगितला घटनाक्रम
पोलिसांनी आरोपी महिलेला केली अटक (प्रातिनिधिक फोटो)

Crime News: मध्य प्रदेशमधील राजा रघुवंशी हत्या प्रकरणाची देशभरामध्ये चर्चा असतानाच आता झारखंडमध्येही असाच एक विचित्र प्रकार घडला आहे. येथील एका नवविवाहितेने अन्नात विष मिसळून आपल्या पतीचा जीव घेतल्याचं उघड झालं आहे. गरवा तालुक्यामध्ये हा सारा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे लग्नाला अवघे 36 दिवस झालेले असताना या मुलीने आपल्याच पतीला अशापद्धतीने काम संपवलं याबद्दल सध्या पंचक्रोषीत चर्चा आहे.

हत्या करणारी पत्नी अवघ्या 22 वर्षांची

मयत व्यक्तीचं नाव बुद्धनाथ सिंह असं असून त्याचे प्राण घेणाऱ्या आरोपी महिलेचं नाव सुनिता असं आहे. सुनिता ही अवघ्या 22 वर्षांची आहे. सुनिता ही छत्तीसगडमधील रामचरणपूर पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या विष्णुपूर गावातील रघुनाथ सिंह यांची मुलगी आहे. सुनिताला पोलिसांनी सोमवारी सायंकाळी अटक केली आहे. तिला न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवण्यात आलं आहे. बुद्धनाथ सिंह हा रांका पोलीस स्थानकाअंतर्गत येणाऱ्या बाहोककुंदर गावातील रहिवासी होता.

सासूनेच केली तक्रार

आयएएनएस या वृत्तसंस्थेनं पोलीसांनी दाखल केलेल्या रिपोर्टच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मयत बुद्धनाथची आई राजमती देवी यांनी सुनेविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सुनेनं माझ्या मुलाला संपवलं असं राजमती यांचं म्हणणं होतं. सुनिता आणि बुद्धनाथ यांचं 11 मे रोजी लग्न झालं होतं.

दुसऱ्याच दिवशी गेली माहेरी

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सुनिता माहेरी निघून गेल्यानंतर तिचा आणि पतीचा वाद झाला. लग्नाबद्दल नाराजी व्यक्त करताना सुनिताने मला माझा पती बुद्धनाथ अजिबात आवडत नाही असं माहेरच्यांना सांगितलं. मी बुद्धनाथबरोबर एक दिवसही राहू शकत नाही. मी पुन्हा सासरी जाणार नाही, मी इथेच राहणार असं म्हणत सुनिता आपल्या हट्टावर अडून राहिली.

नवऱ्याला खरेदी करायला लावलं किटकनाशक

मात्र सुनिता आणि बुद्धनाथच्या घरच्यांनी तिला सासरीच राहण्याचा सल्ला दिला. लग्न आपल्याला टीकवावं लागेल, असं सांगत सुनिताची समजूत घालण्यात आली. 5 जून रोजी पंचायतीसमोर न्यायनिवाडा झाल्यावर सुनिता पुन्हा सासरी नांदायला गेली. 14 जून रोहित सुनिता आणि बुद्धनाथ रामानुगंज येथील बाजारात फिरायला गेले होते. आपल्याला शेतात वापरण्यासाठी किटकनाशकांची आवश्यकता असल्याचं सांगून सुनिताने पतीला किटकनाशकं खरेदी करण्यास भाग पडलं. बुद्धनाथच्या आईने केलेल्या आरोपानुसार, सुनिताने 15 जून रोजी रात्रीच्या जेवणामध्ये किटकनाशक घातलं होतं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 16 जून रोहित बृद्धनाथ त्याच्या रुममध्ये मृतअवस्थेत आढळून आला.

या प्रकरणामध्ये मयत व्यक्तीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे सुनिताविरुद्ध गुन्हा दाखल करुन तिला अटक करण्यात आली आहे.