राजकीय नेत्यांमुळे नव्हे, निवडणुकीमुळे शहीदपत्नीला न्याय
गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अखेर शहीद अशोक तडवींच्या कुटुंबाला मदत जाहीर केलीय.
विनोद पाटील, झी मीडिया, अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी अखेर शहीद अशोक तडवींच्या कुटुंबाला मदत जाहीर केलीय. पंधरा वर्षांपूर्वी बीएसएफ जवान अशोक तडवी शहीद झाले. मात्र त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून कोणतीही मदत देण्यात आलेली नव्हती.
सभेत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट
शहीद अशोक तडवी यांच्या मुलीनं नर्मदा इथल्या सभेत मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा हट्ट धरला. रूपल तडवी ही थेट मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी उठली. मात्र पोलिसांनी तिला उचलून सभेबाहेर काढलं. सभा झाल्यानंतर भेटण्याचं आश्वासन रुपानी यांनी दिलं.
तिला उचलून सभेबाहेर काढलं
मात्र ते न भेटताच निघून गेले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि रूपानी यांच्यावर ट्विटरवरून हल्ला चढवला. तर काँग्रेसन शहिदांवरून घाणेरडं राजकारण न करण्याचं सांगत रूपानींनी राहुल गांधींचा समाचार घेतला.
पेन्शन आणि निवासासाठी भूखंड देण्याचं जाहीर
मात्र ऐन निवडणुकीत प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून तातडीनं शहिदाच्या पत्नीला पेन्शन आणि निवासासाठी भूखंड देण्याचं जाहीर केलं. या प्रकरणावरून दोन्ही पक्षात राजकारण रंगलं असलं तरी शहिदाच्या कुटुंबाला न्याय मिळाला हे महत्त्वाचं.