High Security Number Plate: केंद्रीय परिवहन विभागाने प्रत्येक वाहनाला ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’ (एचएसआरपी) अनिवार्य केली आहे. यानंतर वाहन चालकांची धावपळ सुरु असून, मुदतीआधी नंबरप्लेट बदल, दंड टाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र आता महाराष्ट्रातील वाहन चालकांना दिलासा मिळाला असून 30 जूनपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. परिवहन आयुक्तांकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ही नंबरप्लेट लावावी लागणार आहे.
एचएसआरपी नंबर प्लेटसाठी महाराष्ट्राच्या परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर तिथे ऑनलाइन प्रोसेस करावी लागेल. पोर्टलवर आवश्यक ती माहिती भरावी लागेल. तुमचं वाहन आणि फोनचे तपशील वाहन पोर्टलवरील तपशीलाशी जुळतील याची खात्री करुनन घ्या.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर क्लिक करा. तिथे वाहनाचा क्रमांक, चेसी क्रमांक, पत्ता अशी माहिती भरा. अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला पैसे भरावे लागतील. याचा पुरावा म्हणून तुम्हाला पावती डाऊनलोड करता येईल. ही प्रोसेस केल्यानंतर पुढील काही दिवसांत तुमची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट मिळेल.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ॲल्युमिनियमपासून बनवलेली असेल. तिचा आकार फक्त 1.1 मिमी इतका असेल. या प्लेटवर एक होलोग्राम जोडण्यात आला आहे, जो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनांचा सर्व तपशील ऑनलाइन पद्धतीने नोंद होतो. तसंच एक युनिक लेझर क्रमांक छापला जातो. पाटीवरील क्रमांक ‘जीपीएस’शी जोडण्यात आला आहे. त्यामुळे ते वाहन कुठे आहे याची माहिती काही वेळात मिळते.