IRCTCच्या साईटवरून तिकिट काढणाऱ्यांसाठी नियमात बदल
इंडियन रेल्वे केटरिंग ऍंड टुरिझम कॉर्पोरेशनने आपली वेबसाईट अद्ययावत करण्याच्या निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली - इंडियन रेल्वे केटरिंग ऍंड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) आपली वेबसाईट अद्ययावत करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे जे प्रवासी अद्याप विंडोज एक्सपी आणि विंडोज सर्व्हर २००३ वापरतात त्यांना त्यांच्या कॉम्प्युटरवरून आयआरसीटीसीची वेबसाईट उघडता येणार नाही. आयआरसीटीसीने आपली अधिकृत वेबसाईट www.irctc.co.in टीएलएस १.२ या तंत्रज्ञानावर नेण्याचा निर्णय घेतला आहे. वेबसाईटची सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक लोक रेल्वे आणि विमान प्रवासाची तिकिटे काढत असतात. त्याचबरोबर आर्थिक व्यवहारही करत असतात. त्यामुळे वेबसाईटची सुरक्षा आमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.
ज्या कॉम्प्युटरवर अजूनही विंडोज एक्सपी किंवा विंडोज सर्व्हर २००३ आहे. तिथे आयआरसीटीसीची वेबसाईट सुरू होणार नाही. त्यांनी त्यांचा कॉप्मयुटरवरील ऑपरेटिंग सिस्टिम अद्ययावत केल्यानंतरच तिथे आयआरसीटीसीची साईट सुरू होईल. यापूर्वी आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून विमानाची तिकिटे काढणाऱ्या प्रवाशांना ५० लाख रुपयांचा प्रवास विमा मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. यासाठी प्रवाशांकडून कोणतेही आर्थिक शुल्क घेतले जाणार नाही, असे सांगण्यात आले होते.
आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वे प्रवासाची तिकिटे काढणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. या साईटवरून दररोज ५० लाख रेल्वे तिकिटे काढली जातात. तर विमानाची तिकिटे काढण्याचे प्रमाण सहा हजार इतके आहे. सध्या आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरून रेल्वे प्रवासाची तिकिटे काढल्यास प्रवाशांना विमा उपलब्ध करून दिला जातो. १० लाख रुपयांचा विमा फक्त ४९ पैशांमध्ये प्रवाशांना दिला जातो.