नवी दिल्ली : भारत-चीनमध्ये सुरु असलेल्या तणावाचा परिणाम चीनच्या भारतातील बाजारपेठेवर होणार आहे. देशभरात सुरु असलेल्या मोहिमेमध्ये कंफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने महत्वाचा सल्ला दिलाय.  ऑनलाईन कंपन्यांद्वारे विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर ते कोणत्या देशातील आहेत याचा उल्लेख असावा अशी मागणी कॅटने केलीय. ई कॉमर्स कंपन्यांवर विकल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये चीनी वस्तूंची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापारी संघटनेने केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना यासंदर्भात पत्र लिहिले आहे. प्रोडक्टच्या सोबत देशाचे नाव असेल तर ग्राहकांना प्रोडक्ट घ्यायचे की नाही हे ठरवणे सोप्पे जाईल असे कॅटचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले. ई कॉमर्स पोर्टल हे चीनमध्ये बनलेल्या वस्तू विकतात. पण ग्राहकांना याबद्दल माहिती नसते. त्यामुळे चीनी वस्तूंवर बहिष्कार टाकू इच्छिणारे ग्राहक असे करु शकत नाहीत.



सरकारने बनवला नियम 


केंद्र सरकारतर्फे ई कॉमर्स कंपन्यांसाठी एक नवा नियम आणला जाणार आहे. पण यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीय. यानुसार ऑनलाईन विकल्या जाणाऱ्या वस्तूंवर ते कोणत्या देशातील आहेत हे लिहिणे महत्वाचे राहणार आहे. 


चीनला चारही बाजुने घेरण्याची तयारी सुरु आहे. आर्थिक बाजुने चीनची कोंडी करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी सरकारकडून योजना तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीयं. त्यामुळे भारतात वस्तू विकू इच्छिणाऱ्या चीनी कंपन्यांची पडताळणी होणार आहे.