झारखंडचे CM बेपत्ता झाल्याने खळबळ, फोन Switched Off; विमान Airport पार्किंगमध्ये सापडलं; BMW जप्त
सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा शोध घेतला जात आहे. ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे.
सक्तवसुली संचलनालयाकडून (Enforcement Directorate) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांचा शोध घेतला जात आहे. जमीन व्यवहाराशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीच्या पथकाने दिल्लीसहित त्यांच्या 3 ठिकाणी छापेमारी केली आहे. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरु होती. पण ईडीच्या पथकाला हेमंत सोरेन सापडले नाहीत. हेमंत सोरेन मागील 24 तासांपासून बेपत्ता असल्याचा दावा ईडीने केला आहे. तर दुसरीकडे झारखंड मुक्ती मोर्चाने मुख्यमंत्री सुरक्षित असून, आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे हेमंत सोरेन नेमके कुठे आहेत याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही. दरम्यान हेमंत सोरेन यांनी ज्या चार्टर्ड विमानाने रांची ते दिल्ली प्रवास केला ते दिल्ली विमानतळावर पार्क केल्याचं आढळलं आहे. तसंच हेमंत सोरेन यांच्यासह असणाऱ्या अनेकांचे फोन बंद आहेत. याशिवाय दिल्लीत वापरण्यात आली ती बीएमडब्ल्यू कारही जप्त केली आहे. ईडीने त्यांच्या चालकाचीही चौकशी केली आहे. सोमवारी ईडीचे अधिकारी त्यांच्या दिल्ली आणि झारखंडमधील घरी पोहोचले होते. पण काही पत्ता लागला नव्हता.
ईडीने सर्व विमानतळांवर अलर्ट पाठवला आहे. तर दुसरीकडे ईडीला मुख्यमंत्री कार्यालयाकडून एक पत्र मिळालं आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्या 1 वाजता चौकशीसाठी हजर राहतील असं सांगण्यात आलं आहे.
भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री बेपत्ता असून, राज्यपालांना याची दखल घेण्यास सांगितलं आहे. राज्यपालांनी आपली सर्व स्थितीवर असल्याचं सांगितलं आहे. 'हे राज्यपालांचं काम असून, ते मी करत आहे. जेव्हा गरज लागेल तेव्हा योग्य निर्णय घेतला जाईल,' असं ते म्हणाले आहेत. दुसरीकडे सत्ता पक्षाच्या आघाडीत असणाऱ्या आमदारांनी आपली बॅग आणि सामान घेऊन रांचीमधील एका जागी पोहोचण्यास सांगण्यात आलं आहे. काँग्रसचे आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री निवासस्थानी पोहोचत आहेत.
झारखंडचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मारंडी यांनी मुख्यमंत्री रात्री उशिरा पायी धावत गेले असा आरोप केला आहे. हेमंच सोरेन 27 जानेवारीच्या रात्री अचानक दिल्लीसाठी रवाना झाले होते. एका चार्टर्ड फ्लाइटने ते गेले होते. ते एका राजकीय भेटीसाठी जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. तिथे ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत.
याआधी ईडीने त्यांना दहाव्यांदा समन्स पाठवला आणि 29 ते 31 जानेवारीदरम्यान चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. जर ते चौकशीसाठी हजर राहिले नाहीत तर ईडी त्यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करणार आहे.
निवासस्थानी ईडीकडून चौकशी
याआधी 20 जानेवारीला ईडी जमीन घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या चौकशीसाठी रांचीत दाखल झाली होती. महिन्याच्या सुरुवातीला ईडीने केंद्रीय यंत्रणेला पत्र लिहून ते जमीन घोटाळा प्रकरणी निवासस्थानी येऊन जबाब नोंदवू शकतात असं कळवलं होतं. 20 जानेवारीला ईडीने हेमंत सोरेन यांना आठवं समन्स जारी करत चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं.