Eli Lilly launches weight loss drug Mounjaro Launch in India: लठ्ठपणामुळं त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने अमेरिकेतील औषधनिर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी एली लिलीने गुरुवारी भारतात वजन कमी करणारे टीझेंपेटाईड औषध 'मोनजारो' सादर केले आहे. या औषधाच्या मदतीने लोक वजन कमी करु शकणार आहेत. हे औषध भारतीय बाजारात आता विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या औषधाची किंमत किती असेल आणि कंपनी कोणती हे जाणून घेऊया.
अमेरिकेतील लोकप्रिय फार्मा कंपनी Eli Lilly ने CDSCO ची परवानगी मिळाल्यानंतर भारतात लठ्ठपणा कमी करण्याचे औषध बाजारात आणले आहे. या औषधाचे नाव Mounjaro (tirzepatide) असं आहे. एली लिली अँड कंपनीच्या Mounjaro (tirzepatide) या औषधामुळं मधुमेह आणि लठ्ठपणावर मात करण्यात मदत मिळणार आहे. लठ्ठपणा, वाढते वजन आणि टाइप 2 डायबिटीजच्या रुग्णांसाठी हे औषध तयार करण्यात आले आहे असा दावा कंपनीने केला आहे.
हे औषध एकाच डोजच्या स्वरुपात असून आठवड्यातून एकदा स्वतःहून इंजेक्शन देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. भारतात हे औषधाच्या चिठ्ठीवरही उपलब्ध असेल. २.५ मिलीग्रामची किंमत ३,५०० रुपये आणि ५ मिलीग्रामची किंमत ४, ३७५ रुपये आहे. निश्चित डोजनुसार रुग्णांना दरमहा किमान १४,००० रुपये खर्च करावे लागतील. अमेरिकेत या औषधाची किंमत 1000 ते 1200 डॉलरच्या आसपास आहे. अमेरिकेत हे औषध Zepbound नावाने विक्री केली जाते.
न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनकडून प्रकाशित करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायलनुसार, ज्या लोकांनी हे औषध योग्य आहार आणि व्यायाम याचा मेळ साधत घेतलं आहे त्यांनी 15 mg डोस घेऊन 72 आठवड्यात जवळपास 21.8 किलो वजन कमी केलं आहे. तर, 5 एमजी डोस घेतला आहे त्यांनी 15.4 किलो पर्यंत वजन कमी केले आहे.
ज्या कंपनीने हे औषध बनवले आहे त्या कंपनीचे 2024 पर्यंतचे मार्केट व्हॅल्युशन 842 अरब डॉलरच्या जवळपास आहे. कंपनीचा अंदाज आहे की 2030 पर्यंत या औषधांची विक्री 150 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते. ही औषध कंपनी 1876 मध्ये, म्हणजे सुमारे 149 वर्षांपूर्वी, एली लिली नावाच्या लष्करी सैनिकाने सुरू केली होती. कंपनीचा व्यवसाय १८ देशांमध्ये पसरलेला आहे. लिली ही जगातील पहिली फार्मा कंपनी आहे जी पोलिओ लस आणि इन्सुलिन तयार करते.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती कंपनीने केलेल्या दाव्यावर आधारित आहे. ZEE न्यूज त्याच्या सत्यतेची, अचूकतेची किंवा परिणामाची कोणतीही जबाबदारी घेत नाही. औषध वापरण्यापूर्वी, कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)